पटना | बिहार निवडणूकीनंतर बिहार मध्ये जेडीयु आणि भाजप ने सत्तास्थापन केली असली तरी सर्व काही आलबेल नाही. भाजपने अरुणाचल प्रदेशातील जेडीयूचे सहा आमदार फोडल्याने जेडीयूमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. हीच अस्वस्थता हेरून बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी नेत्या राबडी देवी यांनी बिहार मध्ये राजकीय भूकंप होण्याचे संकेत दिले आहेत. नितीश कुमार यांना पुन्हा महाआघाडीत सामील करून घेण्याबाबत पक्षाचे नेते विचार करतील. असं राबडीदेवी यांनी सांगून बिहारमधील मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत.
भाजपने अरुणाचल प्रदेशातील जेडीयूचे आमदार फोडले. यामुळे जेडीयूमध्ये भाजपविरोधात प्रचंड नाराजी आहे. भाजप आघाडी धर्म पाळत नसून उद्या बिहारमध्येही पक्षाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असं जेडीयूला वाटत आहे. त्यामुळे जेडीयू आरजेडीसोबत हातमिळवणी करू शकतो, असं जेडीयू सुप्रिमो लालूप्रसाद यादव यांना वाटतंय. त्यामुळे नितीश कुमार यांना महाआघाडीत आणण्यासाठी स्वत: लालू प्रसाद यादवच सक्रीय झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
नितीश कुमार महाआघाडीत येण्याची शक्यता असल्याने लालू प्रसाद यादव यांनी कुटुंबातील सदस्यांना आणि आरजेडी नेत्यांना कोणत्याही सदस्यांना नितीश कुमार यांच्यावर टीका न करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे लालूंच्या कुटुंबातील एकही सदस्य नितीश कुमार यांच्यावर टीका करताना दिसत नाही.
शरद पवारांची मदत घेणार?
नितीश कुमार पुन्हा महाआघाडीत यावेत म्हणून लालूंनी मोर्चा सांभाळतानाच यूपीएतील बड्या नेत्यांचीही मदत घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नितीश कुमार यांना यूपीएत प्रवेश देण्याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वक्तव्य करावं म्हणूनही लालूंकडून प्रयत्न केले जात आहेत. याबाबत लवकरच पवारांशी संपर्क साधला जाऊ शकतो, असंही सूत्रांनी सांगितलं.