पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत सुरुवातीच्या कलांनुसार भाजप-जेडीयू यांच्या युतीने आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस आणि RJD याची महागठबंधन पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी बिहार विधानसभा निवडणूक निकालात भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. असं झाल्यास मुख्यमंत्री कोण असेल असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भाजप आणि जेडीयू यांच्यातील फॉर्मुला अगोदरच ठरला होता. या फॉर्म्युल्यानुसार जेडीयने १२२ आणि भाजपने १२१ जागा वाटून घेतल्या. एक जागा कमी घेत भाजपने छोट्या भावाची भूमिका घेतली होती.
मुख्यमंत्री कोण?
भाजपने बिहारमध्ये अगोदरपासूनच छोट्या भावाची भूमिका घेतली होती आणि नितीश कुमार हेच आमचे नेते असतील असं सांगितलं होतं. कोणत्याही पक्षाला कितीही जागा मिळाल्या तर नितीश कुमार हेच आमचे मुख्यमंत्री असतील, असं वक्तव्य सुशील कुमार मोदी यांनी जागावाटपाच्या वेळी केलं होतं. त्यामुळे भाजपने जर आपला शब्द पाळला तर जास्त जागा असतानाही छोट्या भावाच्याच भूमिकेत रहावं लागेल.
सध्याच्या आकडेवारीनुसार, एकूण 243 जागांपैकी 131 जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर महागठबंधन अवघ्या 96 जागांवर पुढे आहे. त्यामुळे एनडीए बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 122 जागा जिंकून बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्तास्थापन करेल, असे चित्र तुर्तास दिसत आहे. भारतीय जनता पक्षाला सध्या २३.१८ टक्के मिळाली मते, तर जेडीयूच्या पारड्यात आतापर्यंत पडले १३.४८ टक्के मते मिळाली आहेत.