चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क
मानवी वस्त्यांमध्ये दिवसेंदिवस बिबट्यांचा वावर वाढतच आहे. चोपडा तालुक्यातील पुनगाव शिवारातील शेतातल्या गुरांवर बिबट्याने हल्ला करत एक गाय व गोर्हा फस्त केल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यातील पुनगाव येथील हिरालाल उत्तम बाविस्कर यांचे गावाशेजारी एक शेत आहे. यात त्यांच्या गुरांचा गोठा असून यामध्ये एक गाय आणि गोर्ह्यांची जोडी बांधली होती. शनिवारी रात्री ते घरी आल्यानंतर बिबट्याने गोठ्यातील गुरांवर हल्ला चढवला. यात एक गोर्हा ठार झाला तर दुसर्याला बिबट्याने गंभीर जखमी केले. तर गाईला ठार करून बिबट्याने तिचे मांस फस्त केले.
हिरालाल बाविस्कर यांचा मुलगा आशुतोष बाविस्कर हा हिरालाल शेतात गेला असता ही घटना उघडकीस आली. यामुळे परिसरात भीती पसरली आहे. तर वन विभागाने याची दखल घेऊन बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातून करण्यात येत आहे.