पुणे :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला उद्यापासून (२१ फेब्रुवारी) सुरू होत आहे. या परीक्षेला राज्यभरातील १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली असून २ हजार ९५७ केंद्रांवर बसणार असून ही परीक्षा २० मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेपूर्वी अर्धातास म्हणजे साडेदहाच्या पूर्वी आणि दुपारच्या सत्रात अडीच पूर्वी परीक्षा केंद्रावर हजर राहायचे आहे.
या परीक्षेचे वेळापत्रक बोर्डाच्या वेबसाइटवर २२ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आले होते. यंदा प्रथमच प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले होते. नऊ भाषा विषयांसाठी कृतीपत्रिका तर, विज्ञान आणि गणित विषयांच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे. यंदा विशेष बाब म्हणून मुंबईतील सोफिया कनिष्ठ महाविद्यालयातील निष्का नरेश हसनगडी ही दिव्यांग विद्यार्थिनी आय-पॅडवर परीक्षा देणार आहे. निष्काला लिहिता येत नाही, त्यामुळे तिला नियमानुसार तशी परवानगी देण्यात आली आहे, असे मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी सांगितले.