नवी दिल्ली :- भाजपाच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असा दावा केला. ‘त्या’ विधानावरून कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. बापूंचा मारेकरी देशभक्त? हे राम! तुमच्या उमेदवारापासून फारकत घेणे पुरेसे नाही. भाजपच्या राष्ट्रवादी विद्वानांमध्ये भूमिका स्पष्ट करण्याचे धाडस आहे का, असे आव्हान प्रियंका यांनी ट्विटरवरील प्रतिक्रियेतून दिले आहे.
दरम्यान, साध्वींच्या वक्तव्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. हुतात्म्यांचा अवमान करणे हे भाजपच्या डीएनएमध्येच आहे. साध्वींनी आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जावी. त्यांना भोपाळ लोकसभा मतदारसंघातून देण्यात आलेली उमेदवारी रद्द केली जावी, अशी मागणीही त्या पक्षाने केली आहे.