बापरे.. व्यक्तीचं हृदय तब्बल तीन वर्षांनंतर पुन्हा सुरू झालंǃ

0

नोएडा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कधी कधी निसर्गाचे अनोखे चमत्कार ऐकून विश्वास बसत नाही. मानवी शरीरातला ‘हृदय’ हा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. जर एखाद्या व्यक्तीचं हृदय पूर्णपणे बंद पडलं तर त्या व्यक्तीचा जीव जातोच. मात्र, विज्ञानशास्त्राने इतकी प्रगती केली आहे, की एका व्यक्तीचं बंद पडलेलं हृदय तब्बल तीन वर्षांनी पुन्हा सुरू झाले आहे. नोएडामध्येही आश्चर्यकारक घटना घडली आहे.

नोएडा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचं हृदय 3 वर्षांपूर्वी निकामी झालं आणि त्याचं कार्य बंद झालं होतं. त्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी त्याच्या शरीरात कृत्रिम हृदय बसवलं. आता 3 वर्षांनंतर अचानक त्या व्यक्तीचं हृदय पुन्हा धडधडू लागलं आहे. नोएडातील फोर्टिस हार्ट अँड व्हॅस्क्युलर इन्स्टिट्यूटमधल्या डॉक्टर्सनी हा चमत्कार करून दाखवला आहे.

कृत्रिम हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तीचं नाव हनी जवाद मोहम्मद असून तो इराकचा रहिवासी आहे. मोहम्मद 2018 मध्ये भारतात आला होता. त्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी त्याच्या शरीरात कृत्रिम हृदय म्हणजेच व्हेंट्रिकल असिस्ट डिव्हाइस बसवलं होतं. आता ते शरीरातून पुन्हा बाहेर काढण्यात आलं आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रुग्णाचं हृदय पुन्हा काम करू लागल्याची आतापर्यंत जगभरात फक्त 2 किंवा 3 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. भारतातली अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. या रुग्णाला आता मशीनच्या साह्याची गरज नाही, असंदेखील डॉक्टर म्हणाले. इराकचा नागरिक असलेल्या या व्यक्तीला 2018 मध्ये नोएडात आणण्यात आलं होतं. तेव्हा ती व्यक्ती अंथरुणाला खिळून होती. त्याच्यावर हृदय प्रत्यारोपणासाठी शस्त्रक्रिया करण्यासाठी हृदय मिळवणं कठीण होतं. अशा परिस्थितीत, त्याचा जीव वाचवण्यासाठी त्याच्या शरीरात कृत्रिम हृदय म्हणजेच व्हेंट्रिकल असिस्ट डिव्हाइस  (LAVD) बसवल्याची माहिती फोर्टिस हार्ट अँड व्हॅस्क्युलर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. अजय कौल यांनी  दिली.

कृत्रिम हृदय शरीरात बसवल्यानंतर दोन आठवड्यांनी त्या रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. नंतर तो इराकला गेला. पुन्हा जेव्हा तो तपासणीसाठी आला तेव्हा त्याचं मूळ हृदय काम करत असल्याचं लक्षात आलं. म्हणून व्हेंट्रिकल असिस्ट डिव्हाइसचा वेग कमी करण्यात आला. त्यानंतर पुन्हा दोन वर्षं या रुग्णाला देखरेखीखाली ठेवण्यात आलं. त्याला दर सहा महिन्यांनी तपासणीसाठी भारतात आणलं जातं होतं. आता तीन वर्षांनी त्याचं हृदय पुन्हा पूर्णपणे काम करू लागलं आहे. त्यामुळं त्याला कृत्रिम हृदयाची गरज नाही.  कृत्रिम हृदय  व्यक्तीच्या छातीच्या आत बसवलं जातं. या यंत्राच्या तारा शरीराबाहेर असतात. यासाठी छातीत एक छिद्र केलं जातं. हे मशीन चार्ज होणाऱ्या बॅटरीवर चालतं. अशा रुग्णाचं दररोज ड्रेसिंगदेखील केलं जातं.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here