पुणे : राज्यासह पुण्यात कोरोना स्थिती बिकट होत चालली आहे. दररोज रुग्णवाढीचा वेग जोराने वाढत आहे. त्यात मृत्यूचेही प्रमाण वाढत आहे. दरम्यान, कोरोनाने अवघ्या पंधरा दिवसात एक संपूर्ण कुटुंब संपवलं आहे. पुण्यातील जाधव कुटुंबातील पाच जणांचा गेल्या 15 दिवसांत कोरोनाने मृत्यू झाला आहे. आई अलका जाधव, भाऊ रोहित जाधव, अतुल जाधव आणि बहीण वैशाली गायकवाड यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पूजेच्या निमित्ताने हे कुटुंब एकत्र आलं होतं. पूजेनंतर घरात कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर एकामागोमाग एक अशा पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे जाधव कुटुंबच संपलं.
एकाच कुटुंबातील पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. अवघ्या 15 दिवसात संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब मृत्यूमुखी पडल्याने, कोरोनाचं भयाण रुप समोर येत आहे. जाधव कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वी घरात पूजेचं आयोजन केलं होतं. या पूजेच्या निमित्ताने घरातील सर्वजण एकत्र आले होते. एकाच कुटुंबातील सर्वजण असल्याने ते काहीसे निश्चिंत होते. मात्र एकामागोमाग एकाला कोरोनाने गाठलं. पुढे त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि अवघ्या 15 दिवसात तब्बल 5 जणांचा मृत्यू झाला.
कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रहिवाशांव्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना प्रवेश करण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे. तसेच नियमित सोसायटीमध्ये येणाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी आवश्यक आहे, असे आदेश पुणे महापालिकेने दिले आहेत.

