बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज भारत बंदची हाक !

0

बंदला महाराष्ट्रातील विविध व्यापारी संघटनांचा पाठिंबा देण्यास नकार

मुंबई : बहुजन क्रांती मोर्चाने सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमविरोधात आज (२९ जानेवारी) भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदमध्ये व्यापारी, दुकानदार आणि सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बहुजन क्रांती मोर्चाकडून करण्यात आलं आहे. मात्र, या बंदला महाराष्ट्रातील विविध व्यापारी संघटनांनी पाठिंबा देण्यास नकार दिला आहे.

बंद यशस्वी व्हावा यासाठीच आंदोलक रेल रोको करण्यासाठी ट्रॅकवर उतरले होते. कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर रेल रोको करण्यात आल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. यावेळी आंदोलकांनी सीएसएमटीकडे जाणारी लोकल रोखून धरली. या आंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिराने धावत आहे. आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ट्रॅकवरुन हटवलं असून ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, या बंद बाबत सातारा शहर व्यापारी संघटनेकडून एक पत्रक जारी केलं असून त्या पत्रकात बंद न पाळण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना करण्यात आलं आहे. या बंदचा आमचा दुरान्वये संबंध नसतानाही अतोनात नुकसान होत आहे”, अशी भूमिका साताऱ्याच्या व्यापारी संघटनेने पत्रकाद्वारे स्पष्ट केली आहे. “पोलीस आणि प्रशासनाने व्यावसाय सुरु ठेवण्यासाठी संरक्षण द्यावे”, अशी मागणी सातारा शहर व्यापारी संघटनांनी पत्रकाद्वारे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.