मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस,एकनाथराव खडसे
अन सर्व लोकप्रतिनिधींच्या अभिनंदनाचा ठराव
जळगाव ;- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव असे नामकरण करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे विद्यापीठाच्या अधिसभेने स्वागत करुन या नामकरणाला सर्वानुमते मान्यता दिली.
कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि.27 मार्च रोजी अधिसभेची बैठक झाली. या बौठकीत 22 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांनी विद्यापीठाच्या नामकरणाबाबत केलेल्या घोषणेबद्दल अधिसभा सदस्यांनी आनंद व्यक्त करुन आपल्या भावना मांडल्या. दिनेश खरात यांनी मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे अधिसभा सदस्य एकमुखाने स्वागत करीत असल्याचा ठराव मांडला.या ठरावाला डॉ.अजय सुरवाडे यांनी अनुमोदन दिले.
प्राचार्य आर.एस.पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा अभिनंदन करणारा ठराव मांडला. प्राचार्य लता मोरे यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. आमदार एकनाथराव खडसे आणि सर्व लोकप्रतिनिधींचे अभिनंदन करणारा ठराव देखील यावेळी मांडण्यात आला. दिनेश खरात व प्रा.संजय सोनवणे यांनी त्याला अनुमोदन दिले. प्राचार्य आर.एस.पाटील यांनी मूल्य व जीवन शिक्षणाचा हा विजय असल्याची भावना व्यक्त केली. दिलीप पाटील यांनी विद्यापीठात बहिणाबार्इंच्या नावे स्वतंत्र दालन उभे करावे अशी मागणी केली.
चर्चेत प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य डी.आर.पाटील, प्राचार्य पी.एम.पवार, प्राचार्य पी.पी.छाजेड यांच्यासह प्राचार्य ए.टी.पाटील, प्राचार्य सुभाष राणे, दिगंबर पवार, प्रा.प्रकाश अहिरराव, प्रा.एकनाथ नेहते. प्रा.गौतम कुवर आदींनी भाग घेतला. अस्मितादर्शचे संपादक व ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांना अधिसभेने यावेळी श्रध्दाजंली अर्पण केली. दिलीप पाटील यांनी शोक प्रस्ताव मांडला. प्रा.संजय सोनवणे व प्राचार्य आर.एस.पाटील यांनी अनुमोदन दिले.
