जळगाव | प्रतिनिधी
लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी येथील समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्तांसह दोघांविरुद्ध रामानंद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतू तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्थानकात गेल्यावर आपल्यावरच आरडा-ओरडा करुन चक्क मध्यरात्री 2 वाजेपर्यंत बसवून ठेवण्यात आल्याची आपबिती पिडीत युवतीने कथन केली. गुन्हा दाखल होऊन 12 तासापेक्षा अधिकचा कालावधी उलटूनही आरोपीला अटक न झाल्यामुळे यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय देखील पिडीतेने व्यक्त केलाय.
साधारण 7 महिन्यांपूर्वी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश सुभाषराव पाटील यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांनी मॅसेज टाकायला सुरुवात केली आणि माझ्या एकटेपणाचा फायदा घेतला. मी तुझी सर्व जबाबदारी घेतो, असे सांगून मला एकेदिवशी जेवणाचा डबा घेऊन घरी बोलावले. त्यानंतर त्यांनी माझे लक्ष नसतांना किचनमध्ये जात जेवणात काही तरी मिसळले. त्यामुळे मला गुंगी आली. माझी शुद्ध हरपल्याचा फायदा घेत त्यांनी अत्याचार केला. त्यानंतर मला लग्नाचे आश्वासन दिले. परंतू नंतर मला पैसे घेऊन सगळं विसरून जा असे सांगितले. दोन वेळेस योगेश पाटील यांचे वडील आणि पत्नीने देखील आपल्याला पैशांचे आमिष दिले. परंतू मी नकार दिल्यावर माझ्याविरुद्धच पोलीस स्थानकात खोटी तक्रार देण्यात आली.
रविवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास या संदर्भात रामानंद पोलीस स्थानकात गेल्यावर मला बराच वेळ बसवून ठेवण्यात आले. पोलिस स्थानकात माझ्यावर सर्वच जण ओरडत होते. एक अधिकारी तर फारच मोठ्याने माझ्यावर ओरडत म्हणाला गपचूप बसा. आम्ही तुम्हाला पोलीस स्थानकात बोलावलेले नाही, अशा शब्दात रागावले. रात्री दोन वाजता विभागीय पोलीस अधिकारी नियमित राऊंडला आल्यावर त्यांनी तक्रार घेण्याची सूचना केली. त्यानंतर मध्यरात्री 2 वाजेला तक्रार घेण्यात आली आणि पहाटे 3 वाजेला जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. दरम्यान, आपली कहाणी कथन करतांना पिडीतेचा अश्रूंचा बांध फुटला होता. धक्कादायक म्हणजे काल रात्रीपासून पिडीतेने जेवण देखील केलेले नाही.