निर्मल सिडस्चे संचालक डॉ. सुरेश पाटील यांचे प्रतिपादन
पाचोरा दि.२ –
देशी कापसाचे उगमस्थान भारत असल्यामुळे बदलत्या हवामानाशी, वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता देशी कापसामध्ये आहे. देशी कापसाचे महत्व जर लक्षात घेतले तर देशी कापूस वाणामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता आहे. किड व रोग प्रतिकार शक्ती आहे. कमी पाण्यात, कमी खर्चात भरघोस उत्पादन देण्याची क्षमता आहे. म्हणुनच सध्याच्या काळात जमिनीचा बिघडलेला पोत, पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास आणि उत्पादनात होणारी मोठी घट हे नुकसान टाळण्यासाठी कमी पाण्यात व कमी खर्चात येणारे पिक म्हणजे देशी कापुस. पाण्याचे महत्व लक्षात घेता देशी कापसाची लागवड करणे शेतकऱ्यांच्या फार हिताचे आहे असे प्रतिपादन निर्मल सिडस्चे संचालक डॉ. सुरेश पाटील यांनी केले. निर्मल सिडस् व्दारा आयोजित जळगाव जिल्हयातील वितरक व विक्रेता स्नेह संमेलन सोहळ्यात ते बोलत होते. स्नेहसंमेलन सोहळा जळगाव येथील हॉटेल कमल पॅराडाईजमध्ये नुकताच संपन्न झाला. या शानदार सोहळ्यात निर्मल सिडस्ने विकसीत करुन बाजारात आणलेले नवे उत्पादन ‘‘रायझामिका’’ आणि ‘‘स्नायपर’’ या दोन जैविक उत्पादनांचे अनावरण निर्मल सिडस्चे संचालक डॉ. सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या शानदार सोहळ्यास निर्मल सिडस्चे संचालक डि.आर.देशमुख, भडगाव येथील गजेंद्र कृषी सेवा केंद्राचे संचालक मेहतापसिंग नाईक, कृषी विकास अधिकारी मधुकरराव चौधरी, जळगाव आदर्श ॲग्रोचे संचालक राजेंद्र धनसिंग पाटील, धरणगाव कैलास ॲग्रोचे संचालक कैलास मालु, खंडेलवाल ॲग्रो कृषी सेवा केंद्राचे संचालक अनिल खंडेलवाल त्याचबरोबर निर्मल सिडस्चे उपमहाव्यवस्थापक जी.एम.पाटील, पी.ए.दळवी, वसंत वायाळ आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जी.एम. पाटील म्हणाले की, निर्मल सिडस्च्या ३२ वर्षांच्या वाटचालीत अनेक चढउतार आले असून केवळ वितरक व विक्रेता बांधवाच्या अखंड सहकार्य व प्रेमामुळे निर्मल सिडस्चा इतिहास गौरवशाली बनला. त्याचबरोबर निर्मलची देशी कपाशी एन.ए.सी.एच. – ४३३, एन.ए.सी.एच. – ४६१ (राधा) तसेच एन.ए.सी.एच. – ५६० हे देशी कापूस वाण उत्कृष्ट असून शेतकऱ्यांपर्यंत वितरक बांधवांनी पोहचवावे असे अवाहान त्यांनी केले. नविन प्रॉडक्टच्या लाँचिंग नंतर पी.ए.दळवी यांनी नविन उत्पादनांची माहिती देतांना सांगितले की ही दोन्ही उत्पादने नव्या युगाची जैविक उत्पादने आहेत. रायझामिका हे रुट ऑरगन कल्चर या अभिनव पध्दतीने ग्लोमस नावाच्या तीन प्रजातींपासून तयार केलेले हे मायकोरायझल जैविक खत आहे. यामुळे रासायनिक खतांच्या मात्रेत २०-२५ टक्के बचत होते. हे तंत्रज्ञान पेंटेंडेड असून शेतीच्या शाश्वत विकासासाठी वरदान ठरले आहे. तर स्नायपर हे अनेक पिकांसाठी रासायनिक किटकनाशकाला जैविक पर्याय म्हणुन प्रभावशाली असून वाळवी, हुमणी व लष्करी अळीच्या सक्षम नियंत्रणासाठी प्रभावी आहे अशी माहिती त्यांनी दिली. डि.आर.देशमुख यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, शेतीचा विकास व शेतकऱ्यांची समृध्दी यासाठी गरजेवर आधारीत संशोधन व नवं तंत्रज्ञान हे उदात्त ध्येय डोळ्यासमोर ठेवून भारतातील शेतकऱ्यांपर्यंत नवनवे कृषी संशोधन व तंत्रज्ञान पोहचवून गेली ३ दशके आम्ही शेतकऱ्यांच्या निरंतर सेवेत आहोत. शेतीच्या विकासासाठी व शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आम्ही ‘‘क्लास दहा हजार’’ या उच्च कोटीच्या अत्याधुनिक गुणवत्तेच्या वर्गात मोडणारी प्रशस्त प्रयोगशाळा उभारुन एक अव्दितीय जैविक तंत्रज्ञान उपलब्ध केले असल्याची माहिती डि.आर. देशमुख यांनी दिली.
मेहतापसिंग नाईक मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, वितरक व विक्रेता बांधव आणि निर्मल सिडस् यांचा ॠणानुबंध अतिशय घट्ट असून तो जिव्हाळ्याचा आहे. स्नेहाचा व आपुलकीचा तो ठेवा आहे. असा उजाळा त्यांनी मनोगतातून दिला.
कृषी विकास अधिकारी मधुकरराव चौधरी म्हणाले की, निर्मल सिडस्च्या संशोधनाची व्याप्ती मोठी असून बियाणे क्षेत्रात अनेक क्रांतीकारी वाणं निर्मलची आहेत. निर्मलचे देशी कपाशी वाण उत्कृष्ट आहेत. काळाची गरज म्हणुन शेतकऱ्यांनी देशी कापसाची लागवड करायला हवी. तसेच जैविक उत्पादन निर्मिती क्षेत्रातही निर्मलने क्रांती केली आहे. त्याचबरोबर वितरक व विक्रेत्यांना खरीफ हंगामसाठी त्यांनी यथोचित व सविस्तरपणे मार्गर्शन केले.
याप्रसंगी नोवेल सिडस् चे संचालक डॉ. जितेंद्र सोलंकी, संकेत पाटील व तुषार देशमुख, निर्मल सिडस्चे झोनल मॅनेजर आर.आर.बागुल, प्रदिप पाटील, नाना पाटील, भटुसिंग महाले, चंद्रकांत वाघ, विजय कच्छवा, सुभाष पाटील, भुषण गावंडे, जगदिश पाटील इत्यादीसह जळगाव जिल्हयातील निर्मल सिडस्चे वितरक व विक्रेता ५०० हून अधिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन वसंत वायाळ यांनी केले तर सुत्रसंचालन रवि चौरपगार यांनी केले.