जळगाव, दि.20 –
तालुक्यातील मोहाडी शिवारात एका शेतात काल रात्री झालेल्या वादळामुळे विद्युत खांब कोसळला होता. मंगळवारी सकाळी 1015 च्या सुमारास एक शेतकरी बकर्या चारण्यासाठी शेतात गेले असता तुटलेल्या विद्युत तारांचा तिला झटका बसला. यावेळी लगबगीने बकरीला वाचविण्याच्या प्रयत्नात असलेल्या वृध्दाला शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सोमवार दि.19 रोजी शहरासह परिसरात वादळी वार्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे, विद्युत पोल तुटल्याने विद्युत प्रवाह असलेल्या तार रस्त्यावर पडलेल्या होत्या.
बकरी तारांमध्ये अडकली
मंगळवारी सकाळी 10.15 च्या सुमारास मोहाडी येथील अर्जुन गिरधर सोनवणे वय-55 रा.मोहाडी हे शेत शिवारात बकरा चारण्यासाठी गेले होते. यावेळी तुटलेल्या विद्युत तारांमध्ये एक बकरी अडकली. या बकरीला काढण्यासाठी अर्जून सोनवणे हे गेले असता, त्यांना तुटलेल्या विद्युत तारांचा शॉक लागला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
जिल्हा रूग्णालयात आक्रोश
ग्रामस्थांनी अर्जुन सोनवणे यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी सीएमओ डॉ.आकाश चौधरी यांनी त्यांना तपासणीअंती मृत घोषित केले. याबाबत डॉक्टरांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मयत अर्जून सोनवणे यांच्या पश्चात पत्नी नलीनीबाई, मुलगा संदिप, हेमंत व मुलगी योजना असा परिवार आहे.