जळगाव :- शहरातील नागेश्वर कॉलनीत बंद घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी उघडक झाली.
नागेश्वर कॉलनीत राहणारे चेतन नरेंद्र कुलकर्णी (वय ३१, रा. नागेश्वर कॉलनी) यांच्या घरात ही चोरी झाली. कुलकर्णी विद्यापीठात नोकरीस आहेत. २४ जून रोजी आई साेबत चोपडा येथे ते सासरवाडीला गेले होते. त्यामुळे त्यांचे दुमजली घर बंद होते. ही संधी साधून चोरट्यांनी मंगळवारी रात्री कडी-कोयंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे जाेडवे, १० हजार रुपये रोख असा ३५ हजार रुपयांचा ऐवज लांबवला. कुळकर्णी हे बुधवारी सकाळी ८ वाजता घरी आल्यानंतर त्यांना कुलूप व कडी-कोयंडा तुटलेला दिसून आला. घरात चोरी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाची तातडीने पाहणी करून चौकशी सुरू केली.