‘बँक फोडून टाकेन!’ नवनीत राणांना संताप अनावर

0

अमरावती : अलाहाबाद बँकेच्या अनागोंदी कारभारामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना राग अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. नवनीत राणा मेळघाटमधील चुर्णी गावाच्या दौऱ्यावर असताना त्यांना ग्राहकांनी बँकेकडून होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. आणि संतापाच्या भरात नवनीत राणा यांनी योग्य उत्तर न दिल्यास बँक फोडण्याचा इशारा दिला.

अलाहाबाद बँकेच्या शाखेबाहेर लागलेली लोकांची रांग पाहून नवनीत राणा थांबल्या. त्यांनी लोकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. यावेळी खात्यातील जमा रकमेची माहिती घ्यायची असल्यास बँक कर्मचारी दिरंगाई करतात, बँकेतून एक हजार रुपये काढायचे असल्यास चार दिवस बँकेच्या चकरा माराव्या लागतात, अशी माहिती उपस्थित ग्राहकांनी नवनीत राणा यांना दिली.

नवनीत राणा यांनी यासंदर्भात बँक कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे नवनीत राणा यांना राग अनावर झाला. ‘पाच वाजेपर्यंत मी इथेच थांबते. तोपर्यंत योग्य उत्तर मिळालं नाही, तर बँक फोडून टाकेन, असा दमही त्यांनी दिला. शेवटी पाच वाजता बँकेने लेखी आश्वासन दिल्यानंतर नवनीत राणा तिथून निघाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.