बँकांच्या संपामुळे ग्राहकांची गैरसोय : एटीएम झाले रिकामे

0

पेण:-  शनिवार, रविवार बँकांना सुट्टी असल्यामुळे व सोमवार मंगळवारी बँकांनी संप केल्यामुळे सलग ४ दिवस ग्राहकांना बँकींग सेवा न मिळाल्याने ग्राहकांची आर्थिक गैरसोय झाली आहे. त्यातच एटीएम मधून अनेक ग्राहकांनी पैसे काढल्याने पेण तालुक्यातील बँकांचे एटीएम रिकामे झाले आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांना एटीएम मधून रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.राष्ट्रीयीकृत बँकेतील ठेवीदारांच्या बचतीच्या सुरक्षिततेसाठी ९ प्रमुख संघटनांनी (यु.एफ.बी.यु.) १५ व १६ मार्च ला खासगीकरण विरोधात संप पुकारला.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आय.डी.बी.आय. आणि दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करण्यात येईल असे जाहीर केल्यानंतर काही दिवसांनी सर्व राष्ट्रीकृत बँकांचे खासगीकरण करण्यात येईल अश्या बातम्या व्हायरल होऊ लागल्या. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरणा विरोधात बँक कर्मचाऱ्यांच्या ९ प्रमुख संघटनांनी (यु.एफ.बी.यु.) ने १५ आणि १६ मार्च ला संप पुकारला.

राष्ट्रीयीकृत बँकांचे खाजगीकरण झाल्यानंतर खेड्यापाड्यातील बँकांची सेवा बंद होईल, शेतीला कर्ज पुरवठा होणार नाही, बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी कर्ज मिळणार नाही, शैक्षणिक कर्ज मिळणार नाहीत, महानगरे, शहरातून जास्तीत जास्त बँकिंग होईल, जास्तीत जास्त सुप्त चार्जेस आकारल्या जातील, आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना कमीत कमी कर्ज उपलब्ध होतील अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

केंद्र शासनाने दिवाळखोरीत जाणाऱ्या खाजगी क्षेत्रातील येस बँकेला वाचविण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँकेला पुढाकार घ्यायला लावला. तसेच आय.डी,बी.आय. बँकेने युनायटेड वेस्टर्न बँकेला वाचवले आणि  केंद्रसरकार आता ह्याच वाचविणाऱ्या सरकारी बँकांचे खासगीकरण करू पहात आहे. शासनाच्या या दुटप्पी भूमिकेविरोधात बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी दोन दिवसाचा संप पुकारला परंतु सलग एकूण चार दिवस बँका बंद राहिल्याने बँकांच्या हजारो ग्राहकांची आर्थिक कोंडी मात्र झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.