मुंबई : महाराष्ट्रातला सत्ता स्थापनेचा पेच सुटण्याच्या मार्गावर आहे असं समजतं आहे. कारण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सत्तास्थापनेचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. या फॉर्म्युलानुसार मंत्रीमंडळात एकूण 42 मंत्री असण्याची शक्यता आहे. त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येक 15 मंत्री असतील तर काँग्रेसला 12 मंत्रीपदं मिळणार असल्याचं समजतं आहे.
शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत औपचारिक सहमती झाली. यामुळे महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, यावर सहमती झाली. मात्र, सरकारचे स्वरूप आणि किमान समान कार्यक्रमावर दोन्ही काँग्रेसच्या वाटाघाटी अपूर्ण असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, दर ४ आमदारांमागे १ मंत्रिपद अशी अट काँग्रेसने ठेवल्याची माहितीही सूत्रांनी दिली. शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ तर काँग्रेसला ४४ जागा विधानसभा निवडणुकीच्या निकालात मिळाल्या. आता आघाडीसोबत शिवसेनेने हातमिळवणी केल्याने मंत्रिपदांचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. एवढंच नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष मुख्यमंत्रीपदही अडीच-अडीच वर्षे वाटून घेतील अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.