भुसावळ (प्रतिनिधि )- भुसावळ तालुक्यातील फेकरी गावाजवळ असलेल्या टोल नाक्यावरून प्रवास करणार्या वाहनधारकांना आता 1 डिसेंबरपासून जादा टोलचा भूर्दंड सोसावा लागणार आहे त्यामुळे वाहनधारकांची काहीशी चिंता वाढली आहे. माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी सुमारे फेकरी टोल नाका बंद होणार असल्याची माहिती बहिणाबाई महोत्सवात दिली होती मात्र त्यानंतर संबंधित ठेकेदार न्यायालयात गेल्याने त्यास स्टे आल्याचे खडसे यांनी सांगितले.हलक्या वाहनधारकांना दिलासा मात्र जड वाहनधारकांची वाढली चिंता
फेकरी टोल नाक्यावरून प्रवास करणार्या जड वाहन धारकांना नव्या दरानुसार टोल भरावा लागणार आहे तर हलक्या वाहन धारकांना मात्र त्यातून दिलासा मिळाला आहे. भारत सरकार सडक परीवहन आणि राज मार्ग, नवी दिल्लीच्या कार्यालय आदेश 1610 अ.दिनांक 1 जुलै 2009 अधिसूचनेनुसार महाराष्ट्र राज्यातील किलोमीटर क्रमांक 399 स्थित फेकरी गावाजवळील असलेल्या टोल नाक्यावरील दरात 1 डिसेंबर 2020 ते 3 ऑक्टोंबर 2022 दरम्यान नवीन दरवाढ लागू राहणार आहे. नवीन दरात हलक्या वाहनांना वगळून बस, ट्रक, टँकर, जड व अति जड वाहनांच्या टोलमध्ये वाढ करण्यात आली आहे.
1 डिसेंबरपासून वाहनधारकांना असा भरावा लागणार टोल
हलके वाहन जुने दर एकेरी प्रवास 15 रुपये, नवीन दर 15 रुपये, दैनिक पास जुने दर 22.50 रुपये, नवीन दर 22.50, मासिक पास जुने दर 450 रुपये तर नवीन मासिक पास दर 450 रुपये, बस एकेरी प्रवास जुने दर 35 रुपये तर नवीन दर 40 रुपये, दैनिक पास जुने दर 52.50 रुपये तर नवीन दर 60 रुपये, मासिक पास जुने दर 1050 रुपये, नवीन दर 1200 रुपये करण्यात आला आहे. जड वाहनांना एकेरी प्रवास जुने दर 45 रुपये तर नवीन दर 50 रुपये, दैनिक पास जुने दर 67.50 रुपये तर नवीन दर 75 रुपये करण्यात आला आहे. मासिक पास जुने दर 1350 रुपये तर नवीन दर मासिक पास 1500 रुपये, अति जड वाहने एकेरी प्रवास जुने दर 60 रुपये, नवीन दर 65 रुपये, दैनिक पास जुने दर 90 रुपये, नवीन दर 97.50 रुपये तसेच मासिक पास जुने दर 1800 रुपये, नवीन दर 1950 रुपये करण्यात आला असल्याची माहिती फेकरी टोल नाक्याचे व्यवस्थापक योगेश गुंजाळ यांनी दिली.
न्यायालयाचा ‘स्टे’ : माजी मंत्री खडसे
भुसावळातील बहिणाबाई महोत्सवात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर फेकरी टोल नाका बंद होणार असल्याची घोषणा केली होती. या संदर्भात खडसे यांना विचारले असता ते म्हणाले की, आपण घोषणा केल्यानंतर टोल नाका काही दिवस बंद झाला मात्र न्यायालयात संबंधित ठेकेदार गेल्यानंतर स्टे मिळाला असल्याने अद्याप टोल नाका सुरू असल्याचे ते म्हणाले.