जळगाव :-जिल्ह्याच्या दोन्ही खासदारांनी महिला आरोग्य, प्राथमिक शिक्षण, पिण्याचे पाणी, मुलभूत सुविधा, कृषी सिंचनाच्या कामांकडे दुर्लक्ष केले. मात्र मक्तेदार व स्वत:चे हित असलेल्या हायमास्ट लॅम्पवर खा. रक्षा खडसेंनी 819 पैकी 464 व खा. पाटील यांनी 782 पैकी 213 कामे ही हायमास्ट लॅम्पची केली आहेत, असा आरोप हॅपी मिरर रिसर्च फाऊंडेशनचे डॉ. आशिष जाधव यांनी सर्वेक्षणाअंतर्गत नुकताच केला. यावेळी ईश्वर मोरे, शिवराम पाटील, अनिल नाटेकर, अमोल कोल्हे, धर्मेश पालवे, अशपाक पिंजारी उपस्थित होते.
दोन्ही खासदारांचा निधी अखर्चित
खा. रक्षा खडसे यांचा 8 कोटी 10 लाख 79 हजार 779 रुपये तर खा. ए.टी. पाटील यांचा 6 कोटी 88 लाख 49 हजार76 रुपयांचा निधी अखर्चित आहे.
इस्टीमेटची किंमत दुसर्या वर्षी दुपटीने
जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी त्यांच्या निधीतून पाच वर्षात केलेल्या कामांची माहिती माहिती अधिकारात घेवून त्याचे स्पष्टीकरण केले. मिनी आयमास्टच्या कामाचे 2015 चे इस्टीमेट 62 हजार 449 तर पुढच्याच वर्षी 2015 मध्ये तेच काम 1 लाख 47 हजार रुपये दराने करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हायमास्टची बरीचशी कामे ही फेल्यूअर असल्याचे ते म्हणाले. जळगावात पाण्याचे दुर्भिक्ष असताना विहिरी, कुपनलिकेची व्यवस्था निधीतून न करता अनावश्यक बाबींवर खर्च केला आहे. खासदारांनी स्वत:चा फायदा पाहूनच कामे केली. जिल्हा न्यायालयासाठी पुस्तके खरेदीचे प्रावधान असते मात्र ती खरेदी केलेली नाहीत. रक्षा खडसे यांचे अपरिपक्व नेतृत्व वाटत असून दुर्बल घटकांवर अन्यायाचा आरोप डॉ. जाधव यांनी केला.
सुरेशदादा व आ. भोळेंना जागृत मंचचा विरोध
35 वर्षे ज्यांनी राज्य केले त्यांनी शहर भकास केले. तर शासन चालविण्याची प्रभल्भता नाही या मुद्यांवरुन जागृत मंचने माजी मंत्री सुरेशदादा जैन व आ. राजुमामा भोळे यांना तीव्र विरोध दर्शविला. शिवराम पाटील यांनी यावेळी शहराच्या विविध प्रश्नांसह जळगाव चा आमदार कसा असावा? याबाबत प्रश्नावलीच तयार केलेली आहे. त्यानुसार दोन्हींच्या नावाला विरोध करत त्यांना पर्याय म्हणून जागृत मंचचे शिवराम पाटील यांना उमेदवार म्हणून घोषीत केले.