फडणवीस पाठोपाठ एकनाथ खडसेंनी घेतली शरद पवार यांची भेट

0

मुंबई :  काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. अशातच फडणवीस यांच्या पाठोपाठ राष्ट्रावादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर ही भेट झाली.

दरम्यान एकीकडे फडणवीसांच्या भेटीमुळे आश्चर्य व्यक्त होत असतानाच एकनाथ खडसेही शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून शरद पवार आपल्या निवासस्थानी आराम करत आहे. या काळात अनेक राजकीय पक्षांचे नेते शरद पवार यांना भेटून गेले आहेत.  एकनाथ खडसे बुधवारी सकाळी सिल्व्हर ओकवर आले आणि त्यांनी पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतही याठिकाणी उपस्थित होते. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे एकनाथ खडसे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या दोन दिवसांमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्या घरी जाऊन आले आहेत. शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आपण सदिच्छा भेट घेतल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. तसेच मंगळवारी ते भाजप खासदार रक्षा खडसे यांना भेटण्यासाठी मुक्ताईनगरच्या त्यांच्या घरी गेले होते.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर फडणवीस प्रथमच त्यांच्या घरी गेले होते. मात्र, यावेळी एकनाथ खडसे हे मुंबईत होते. देवेंद्र फडणवीस यांनी रक्षा खडसे यांच्या भेटीनंतर मुक्ताईनगरमधील ग्रामीण रुग्णलयाची पाहणी केली. तसेच वादळ आणि पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचीही पाहणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.