भुसावळ (प्रतिनिधी) : येथील नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांचे मार्गदर्शनाखाली प्लॅस्टिक बंदी पथकाद्वारे भुसावळ शहरातील बाजार परिसरात बंदी असलेल्या सिंगल युज प्लॅस्टिकचा साठा उपयोग करणाऱ्या दुकानांवर छापे टाकण्यात आले.यामध्ये सिद्धिविनायक केक शॉप,आदर्श स्टोअर्स व बऱ्हाणपूर जलेबी या दुकानांमध्ये बंदी असलेले सिंगल युज प्लॅस्टिक आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रत्येकी ५ हजार रू. प्रमाणे एकूण १५ हजार रू. दंड वसूल करण्यात आला. तसेच १८ किलो प्लॅस्टिक सुद्धा जप्त करण्यात आले आहे.
भुसावळ शहरातील सर्व व्यापारी व नागरिकांनी बंदी असलेल्या सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर किंवा साठा करू नये असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. यापुढे नगरपरिषदेकडून नियमित धडक मोहीम राबवुन शहरातील सर्वच भागातील दुकानांची तपासणी करून बंदी असलेले प्लॅस्टिकचे साहित्य आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले. या कारवाई पथकात पाणी पुरवठा अभियंता नितीन लुंगे, स्वच्छता निरीक्षक प्रदीप पवार, वसंत राठोड,निवृत्ती पाटील,कार्यालय अधीक्षक महेंद्र कातोरे यांचा समावेश होता.