प्लास्टिक बंदी : जळगावात एकही कारवाई नाही!

0
आठवडे बाजारात झाले कॅरीबॅगचे दर्शन : इशारा देण्यात अधिकार्‍यांनी मानली धन्यता
जळगाव, दि. 24 –
प्लास्टिकबंदीच्या पहिल्या दिवशीच कडक दंडात्मक कारवाई होण्याच्या भीतीने शनिवारी जळगावकरांनी प्लास्टिकला दूरच ठेवले. मात्र महापालिकेने कारवाईचा बडगा न उगारता प्लास्टिक बाळगणार्‍यांना केवळ इशारा दिला. रविवारी देखील बहुतांश हातगाडीवर प्लास्टिकच्या कॅरीबॅग आढळून आल्याने महापालिकेच्या इशार्‍याला केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी जळगावातील आठवडे बाजार असताना देखील कारवाई न झाल्याने शंका निर्माण केली जात आहे. महापालिकेने थेट दंडात्मक कारवाई सुरू करण्याचा इशारा दिला आहे. अन्य महानगरपालिकेने पहिल्याच दिवशी कारवाईचा धडाका लावल्याने जळगावात देखील मोठी कारवाई होईल असे वाटत होते. मात्र शनिवार, रविवारी कारवाई शून्य झाल्याने विक्रेत्यांची धमक वाढली आहे.
प्लास्टिक बंदीचे उल्लंघन होते की नाही हे पाहण्यासाठी देखील पालिकेच्या अधिकार्‍यांनी गस्त घातली नाही. मात्र प्रत्यक्ष कारवाईपेक्षा केवळ इशारा देण्याचे बाळकडू त्यांनी विक्रेत्यांना पाजले आहे. कारवाईच्या भीतीने अनेक हॉटेलांतून पार्सल सुविधा बंद करण्यात आली. ग्राहकांनी कापडाची पिशवी आणावी, अशा सूचना देणारे फलक एकाही ठिकाणी दिसून आले नाही.
 आरोग्य अधिकारी संभ्रमात
प्लॉस्टीक बंदच्या पहिल्याच दिवशी राज्यातील महापालिकांनी जोरदार कारवाई केली. मात्र जळगाव महापालिका संभ्रमात असल्याची स्थिती आहे. याबाबत महानगपालिकेचे आरोग्य अधिकारी उदय पाटील यांना विचारणा केली असता. कारवाईबाबत संभ्रम निर्माण झाला असल्याने कारवाई झाली नाही. शनिवारी व रविवारी सुटी असल्याने प्लॉस्टीक बंदीची कारवाई अंमलात आणू शकलो नाही. सोमवारपासून शहरात कारवाईला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Leave A Reply

Your email address will not be published.