प्रेम एकीशी अन् संसार दुसरीशी; दोन युवतींवर अत्याचाराची घटना

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

बीड/गेवराई : दोन युवतींवर अत्याचाराची घटना. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले अन् प्रेमातून लग्नाच्या आणाभाका खाल्ल्या; पण प्रियकराने प्रेयसीला अंधारात ठेवून दुसरीशीच संसार थाटला. जिल्ह्यात २४ तासांत अशी दोन प्रकरणे उजेडात आली. याप्रकरणी गेवराई व बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

गेवराई तालुक्यातील १७ वर्षीय पीडित मुलीची ज्ञानेश्वर रमेश घुगे ( २५, रा. कवडगाव, ता. गेवराई) याच्याशी ओळख झाली. पाच वर्षांपासून दोघांचे प्रेम प्रकरण होेते. लग्नाचे आमिष दाखवून ज्ञानेश्वर घुगेने तिच्यावर गेवराई, टीव्ही सेंटर, औरंगाबाद, नेवासा (जि. अहमदनगर) या ठिकाणी वेळोवेळी अत्याचार केला. त्यानंतर भलत्याच मुलीशी लग्न उरकले. पीडिता दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे कळाल्यावर ज्ञानेश्वर घुगेने तिला गोळ्या खायला लावून गर्भपात केला.

पीडितेच्या फिर्यादीवरून ११ जानेवारी रोजी गेवराई पोलीस ठाण्यात बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक अर्चना भोसले यांनी आरोपीस अटक केली. त्यास १२ रोजी न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

१८ वर्षांच्या युवतीवर तीन वर्षांपासून तरुणाने अत्याचार केला. लग्नाचे आमिष दाखवून त्याने कुकर्म केले. मात्र, नंतर दुसऱ्याच मुलीशी विवाह केला. ही घटना १२ जानेवारी रोजी बीड ग्रामीण ठाणे हद्दीतील एका गावात उघडकीस आली. याप्रकरणी विशाल किसन भंडारे (२७, रा. नवगण राजुरी, ता. बीड) याच्यावर बलात्कार, बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा नोंद झाला. दरम्यान, विशाल भंडारेला जेरबंद केले असल्याची माहिती पो.नि. संतोष साबळे यांनी दिली. तपास उपनिरीक्षक मीना तुपे करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.