धरणगाव (प्रतिनिधी) : शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने नवोपक्रम राबविणारे, आपल्या शाळेचा नावलौकिक वाढणारे पी. आर. हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक प्रा.बी.एन.चौधरी यांनी केलेल्या प्रत्येक कामावर त्यांची स्वतःची अशी वेगळी छाप उमटवली आहे असे गौरवोद्गार धरणगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अनिल बाविस्कर यांनी काढले. प्रा. चौधरी यांचा निवृत्ती निमित्त त्यांचा सत्कार करतांना ते बोलत होते.
शाल, ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देवून बावीस्कर यांनी प्रा. चौधरी यांचा सत्कार केला. या प्रसंगी केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष डी.एस.पाटील, जळगाव शिक्षक पतपेढीचे संचालक एस.आर.बन्सी उपस्थित होते. प्रा. चौधरी यांनी शैक्षणिक क्षेत्रात सातत्यपूर्ण काम करतांनाच साहित्य, कला, समाजिक क्षेत्रातही भरीव कामगिरी केली असल्याचे बावीस्कर म्हणाले. निवृत्तीनंतर आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा समाजाला उपयोग करुन द्यावा असा सल्ला त्यांनी दिला.
सत्काराला उत्तर देतांना प्रा. चौधरी यांनी गटशिक्षणाधिकारी बाविस्कर यांच्या गुणग्राहकता, सहृदयतेबद्दल आभार व्यक्त केले. वरीष्ठ अधिकारी जेव्हा आपल्या कामाची स्वतःहून दखल घेतात तेव्हा काम करायला अधिक बळ येते असं ते म्हणाले. निवृत्तीनंतर आपण समजोपयोगी उपक्रमात स्वतःला गुंतवून घेणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एस.पाटील यांनी तर आभार प्रदर्शन एस.आर.बन्सी यांनी केले.