नवी दिल्ली : देशातील पहिल्या दृष्टिहीन महिला आयएएस अधिकारी प्रांजल पाटील यांनी सोमवारी तिरुवअनंतपुरम येथे उपजिल्हाधिकारीपदाची सूत्रे हाती घेतली. प्रांजल पाटील या महाराष्ट्रातील उल्हासनगर येथील रहिवासी आहेत. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी दृष्टी गमावली. पण नियतीसमोर हार न मानता जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले.
‘आपण कधीही हार स्वीकारली नाही पाहिजे, प्रत्येक गोष्टीवर मेहनत घेतली पाहिजे आपल्याला स्वत:ला सिद्ध करण्याची एक संधी नक्की मिळते’, असे प्रांजल पाटील यांनी म्हटले आहे. प्रांजल या केरळ कॅडरमध्ये नियुक्त होणाऱ्या पहिल्या दृष्टिहीन आयएएस अधिकारी आहेत. 2016 मध्ये त्या युपीएससी परीक्षेत 773 व्या आल्या होत्या. मात्र नंतर अभ्यासात प्रगती करून त्यांनी 124 वे स्थान पटकाला.