Wednesday, February 1, 2023

प्रशासनात प्रामाणिक अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवा :- अ‍ॅड. उज्ज्वल निकम

- Advertisement -

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत खानदेशातील गौरव साळुंखे,मानसी पाटील यांनी मिळवलेले हे यश हे गौरवास्पद आहे. त्यांच्या या यशामुळे कामाची अधिक जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. या युवा अधिकाऱ्यांनी चेहऱ्यावर हास्य ठेवून सामान्यांचे प्रश्न  समजून घ्यावेत. भविष्यात त्यांनी प्रशासनात प्रामाणिक अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवावा, असा मौलिक सल्ला जेष्ठ विधीतज्ञ तथा पद्मश्री  उज्ज्वल निकम यांनी केले.

उत्कर्ष खान्देशी अधिकारी व तालुक्यातील विविध विकास मंच तर्फे झालेल्या “कर्तृत्वाचा महासन्मान”  कार्यक्रमात ते बोलत होते.

- Advertisement -

आमदार अनिल पाटील अध्यक्षस्थानी होते. नगराध्यक्षा पुष्पलताताई पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस पाटील, माजी आमदार कृषीभुषण साहेबराव पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार स्मिताताई वाघ, दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आमदार अनिल पाटील म्हणाले की, प्रशासनातील सर्वोच्च पद मिळण्यापूर्वी ची मेहनत ही अतिशय महत्त्वाची असते. नियोजनबद्ध अभ्यासामुळे हे सर्व शक्य होते. आपल्या कार्यकर्तृत्वाने खुर्चीचा सन्मान वाढवा.स्मिता वाघ म्हणाल्या की, या कार्यक्रमामुळे स्पर्धापरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. यातून अनेक अधिकारी घडतील. शिरीष चौधरी म्हणाले की, युवकांनी सक्षम होणे गरजेचे आहे, हे डॉ. कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत करावी. साहेबराव पाटील म्हणाले की, गुणवंतांचा सत्कार बघून मलाही अजून शिकावसे वाटते, हीच या कार्यक्रमाची खरी प्रेरणा आहे. डॉ. बी एस पाटील म्हणाले की, प्रत्येक मुलाने आपल्या आई वडिलांच्या मेहनतीची जाणीव ठेवावी. मोबाईल हा तरुणांचा शत्रू आहे, त्यापासून लांब राहून अभ्यास करा. गणेश पाटील म्हणाले की, अधिकारी व राजकीय व्यक्ती हे एकाच वाहनाची दोन चाके आहेत. ते एकमेकांवर अवलंबून असून दोघांच्या समन्वयातून योग्य शासन-प्रशासन चालते.

सत्कारार्थीचे मनोगत

गौरव साळुंके म्हणाले की, खानदेशातील उच्च अधिकाऱ्यांच्या व्यक्तिमत्त्वातून प्रेरणा घेत हे उत्तुंग यश मी मिळवलेले आहे. समाजहितासाठी या यशाचा कसा उपयोग होईल, यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील. मानसी पाटील म्हणाल्या की, अमळनेर परिसरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, हाच या कार्यक्रमाचा उद्देश होता आणि तो आज यशस्वी झाला आहे.

जळगाव मनपाचे वित्त व लेखाधिकारी कपिल पवार यांनी प्रास्ताविक केले. नोबल फाउंडेशन चे अध्यक्ष प्रा जयदीप पाटील व युनियन बँकेचे वरिष्ठ प्रबंधक मयूर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. व्ही ए पवार यांनी आभार मानले.

यांचा झाला सन्मान

यावेळी यूपीएससी परीक्षेत १८२ रँक मिळविणारे गौरव साळुंखे, ४८४ रँक मिळविणाऱ्या वृष्टी जैन यांच्या वतीने सचिन जैन, एमपीएससी परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम आलेल्या उपजिल्हाधिकारी मानसी पाटील, पशुसंवर्धन अधिकारी तुषार वारुळे यांच्यासह त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.

यांचे मिळाले सहकार्य 

उत्कर्ष खान्देशी अधिकारी मंडळ, शिवशाही फाऊंडेशन, प्रताप तत्वज्ञान केंद्र, साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र, पातोंडा विकास मंच, मारवड विकास मंच, दहिवद विकास मंच, अंबरीष टेकडी विकास मंच, जवखेडा विकास मंच, रणाईचे विकास मंच, शिरुड विकास मंच, डांगर विकास मंच यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे