भडगाव (प्रतिनिधी) : कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे अनेक लहान मोठ्या व्यावसायिकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे, यामुळे विशेषतः फेरीवाले, पथविक्रेते, लहान दुकानदार, बाराबलुतेदार अशा घटकांना याची सर्वाधिक झळ बसली आहे. या परिस्थीतीची केंद्र सरकारला जाणीव आहे, म्हणून देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधीची घोषणा केली आहे.
या योजनेच्या प्रचारासाठी जळगाव लोकसभा क्षेत्राचे खा. उन्मेष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भडगाव येथे बैठक पार पडली. यावेळी भडगाव तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील, पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, मुख्याधिकारी विकास नवाळे,मा. जि.प. सदस्य श्रावण लिंडायत,नाभिक समाज विभागीय अध्यक्ष नानाभाऊ शिरसाठ, भडगाव अध्यक्ष संजय पवार, एनयुएलम च्या समन्वयिका सौ ठाकूर हे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना खा.उन्मेष पाटील म्हणाले की,यामुळे पथविक्रेत्यांना आपला व्यवसाय पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी मोठी मदत होणार आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने विशेष जनजागृती अभिमान सुरू केले आहे. जळगाव जिल्ह्यातील पुढील व्यावसायिकांसाठी केंद्रसरकारने घोषित केलेला निधीचा लाभ घेता येणार आहे. सर्व प्रकारचे लहान दुकानदार, भाजीपाला विक्रेते, फळ, फेरीवाले, चहा, अंडी, भजी, पाव, तयार खाद्य पदार्थ विक्रेते, कापड, चप्पल कारागीर, स्टेशनरी व कटलरी पुस्तक विक्रेता, केश कर्तनालय, लाँड्री दुकानदार, चर्मकार, पान दुकाने, यासारख्या असंख्य दुकानदारांना खेळते भांडवल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भय निधी रू. १००००/- कर्जस्वरूपात देण्यात येत आहे,.या योजनेचा लाभ सर्वांनी घेण्याची सूचना यावेळी केली.
या योजनेअंतर्गत नियमित हप्ते भरल्यास ७% व्याजात सुट मिळणार असून खेळते भांडवल वेळेवर भरल्यास पुढच्या मोठ्या भांडवलाची हमी मिळणार आहे तसेच डिजिटल व्यवहार केल्यास 1200 रु. पर्यंत कॅशबॅक सुविधाही लाभार्थ्यांना मिळणार आहे. नोंदणीसाठी जवळच्या ई -सेवा केंद्रात संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले. याप्रसंगी मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रियेची माहिती दिली. बैठकीचे सूत्रसंचलन अमोल पाटील, प्रास्ताविक अमोल शिंदे तर आभारप्रदर्शन अनिल पाटील यांनी केले. बैठक यशस्वितेसाठी बन्सीलाल परदेशी, प्रदिप सोमवंशी, शेखर बच्छाव, शुभम सुराणा यांनी प्रयत्न केले.

