- प्रतिकुटुंब वार्षिक ५ लाखांपर्यंत विमा संरक्षण
- आयुष्यमान भारत चे ई-कार्ड तयार करून घेण्याचे आवाहन
- पारोळा शहरातील ४१७८ व ग्रामीण भागातील १७४१२ कुटुंबांना लाभ
पारोळा | प्रतिनीधी
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत केंद्र शासनाने निश्चित केलेल्या पात्र लाभार्थ्यांना प्रतिवर्षी प्रतिकुटुंब आरोग्यासाठी पाच लाख रुपये विमा संरक्षण दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत त्या कुटुंबांना ठरावीक आजारासाठी संपूर्ण देशभरातील कोणत्याही मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचार घेता येतील. या योजनेमध्ये सुमारे एक हजार १२२ आजारांचा समावेश आहे. यासाठी लाभार्थी कुटुंबांना ई-कार्ड देण्यात येणार आहे.
पारोळा शहरातील ४१७८ व ग्रामीण भागातील १७४१२ कुटुंबांना याचा लाभ होणार आहे, यामध्ये लाभार्थ्यांना कुटुंबप्रमुखाच्या नावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे साक्षांकित पत्र आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत लाभार्थ्यांना यापूर्वीच वाटप करण्यात आले आहे, ज्यांना हे पत्र मिळाले आहे अशा लाभार्थ्यांनी कॉमन सर्विस सेंटर (सेतू सुविधा केंद्र) वर जाऊन हे कार्ड तयार करून घ्यावे . या पत्रासोबत रेशन कार्ड आधार कार्ड अथवा ते नसल्यास मतदान कार्ड घेऊन आपल्या नजीकच्या कॉमन सर्विस सेंटर (सेतू सुविधा केंद्र) वर जाऊन हे कार्ड तयार करून घ्यावे या सेंटर्सवर कार्ड काढण्याची शासकीय फी फक्त तीस रुपये आहे . कुणीही यापेक्षा जास्त शुल्क देवू नये ,असे आवाहन डॉ तुषार मोरे तालुका आरोग्य अधिकारी पारोळा यांच्या तर्फे करण्यात येत आहे.
‘आयुष्यमान’ ची सुविधा असलेल्या हॉस्पिटल :
सिव्हिल हॉस्पिटल जळगाव, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व रुग्णालय ,ऑर्किड मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, अश्विनी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, खडके हॉस्पिटल अँड हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड, पुष्पा सर्जिकल अँड यूरोलॉजी हॉस्पिटल, सुलोचन रेटिना केअर सेंटर, विश्वनाथ हॉस्पिटल, विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल , पुष्पा सर्जीकल अँड युरोलॉजी हॉस्पिटल, श्री साईलीला एक्सिडेंट हॉस्पिटल, श्री नृसिंह हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, महाजन हॉस्पिटल ,जावळे हॉस्पिटल, गायत्री हॉस्पिटल, भंगाळे सर्जिकल नर्सिंग होम, कमल हॉस्पिटल मॅटर्निटी होम.
यांना मिळणार लाभ : आयुष्यमान भारत योजनेत पात्र लाभार्थी ग्रामीण भागातील अनुसूचित जातीजमातीचे, दारिद्रयरेषेखालील कुटुंब, भूमिहीन, दिव्यांग सदस्य असलेले कुटुंब, अतिकष्टाचे काम करणारे कुटुंब, एका खोलीत कच्च्या घरात राहणारे, महिला कुटुंबप्रमुख असलेले यांचा या योजनेत सहभाग आहे. शहरी भागातील कचरा वेचणारे कुटुंब, भिकारी, घरकाम करणारे, रस्त्यावर विक्र ी करणारे, बांधकाम, रंगकाम, प्लम्बर, गवंडी, वेल्डर, गटई कामगार, फेरीवाले, सफाई कामगार, हस्तकला कारागीर, शिंपी, वाहतूक कर्मचारी, चालक, वाहक व सायकलरिक्षा ओढणारे, दुकानात काम करणारे शिपाई, अटेंडंट, हॉटेल वेटर, मेकॅनिक / वीजतंत्री, असेम्ब्ली, दुरु स्ती करणारे, धोबी आणि चौकीदार आदींच्या कुटुंबांना या योजनेत पात्र ठरवण्यात आले आहे.