प्रदेशाध्यक्षांच्या निवडीनंतरच जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष निवड

0

पक्ष निरीक्षक रंगनाथ काळे यांची माहिती : 29 रोजी पुण्याला प्रदेशाध्यक्ष निवड

जळगाव, दि.22 –
जिल्ह्यात आगामी होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी रविवारी रा.काँ.च्या कार्यालयात निवड प्रक्रियेसाठी बैठक घेण्यात आली. शनिवारपर्यंत तीनच नावे या पदासाठी चर्चेत होती. आता मात्र तब्बल नऊ जण या पदासाठी इच्छुक असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, 29 रोजी पुणे येथे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची निवड होत आहे. या निवडीनंतर पक्ष श्रेष्ठींच्या निर्णयानुसार निवडीवर शिक्कामोर्तब होईल. त्याचवेळी वरील सात तालुक्याध्यक्षांचीही नावे जाहीर होतील, अशी माहिती पक्ष निरीक्षक रंगनाथ काळे यांनी रविवारी झालेल्या पत्रपरिषदेत दिली.
यावेळी अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आ.डॉ.सतीश पाटील, माजी जि.प़ अध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आ.दिलीप वाघ, दिलीप सोनवणे, राजीव देशमुख, ज्ञानेश्‍वर महाजन, माजी आ. अरुण पाटील, विकास पवार, महिला अध्यक्षा कल्पना पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते़.
जिल्ह्यातील 11 विधानसभा क्षेत्रातून रा.काँ.च्या 66 जिल्हा प्रतिनिधींची नावे जिल्हा निरीक्षकांकडे पाठविण्यात आली आहे. यासाठी रविवारी जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात बैठक घेण्याचे ठरविण्यात आले होते. त्यात जिल्हा प्रतिनिधींनी सुचविलेल्या नावाव्यतिरिक्त उमेदवार पक्षश्रेष्ठींना सक्षम वाटत असेल तर, त्यांच्या नावावरही शिक्कामोर्तब करु शकतात, असे संकेत जिल्हा निरीक्षक रंगनाथ काळे यांनी यापूर्वी दिले आहेत. रा.काँ.च्या महानगराध्यक्ष तसेच तालुका निवडीसंदर्भात पक्षाच्या कार्यालयात शनिवारी बैठक झाली होती. त्यात निलेश पाटील यांचे महानगराध्यक्षपदासाठी एकमेव नाव सुचविण्यात आले होते.
जिल्हाध्यक्षपदासाठी माजी मंत्री देवकर यांच्या नावासाठी धरणगाव तर ऍड.पाटील यांच्यासाठी बोदवड, मुक्ताईनगर या तालुक्यातील समर्थकांनी आग्रह धरला. तसेच पक्षाचे विद्यमान कार्याध्यक्ष यांनी बैठकीत विलास पाटील यांनी स्वच्छेने उभे राहून जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छूक असल्याचे जाहीर केले. बैठकीला बोलाविण्यात आले नसल्याबद्दल धरणगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांसह पदाधिकार्यांवनी नाराजी व्यक्त केली.
जळगाव जिल्ह्यातील तालुकाध्यक्षपदासाठी शनिवारी सायंकाळपर्यंत सात तालुक्यामधून प्रत्येकी एकच नाव आल्याने त्यांची निवड निश्‍चित मानली जात आहे़ त्यात भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, धरणगाव, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव या तालुक्यांचा समावेश आहे. प्रदेश प्रतिनिधींकरीता जिल्ह्यातून प्रत्येक क्षेत्रातून तीन अर्ज मागविण्यात आले होते. असे 33 अर्ज प्राप्त झाले आहेत.
जिल्हाध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा आ.डॉ.सतीश पाटील यांचे नाव सुचविण्यात आले आहे. त्यासोबत माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा बँकेचे संचालक ऍड. रवींद्र पाटील, संजय मुरलीधर पवार, अनिल भाईदास पाटील, राजेंद्र पुंडलिक चौधरी, विलास भाऊलाल पाटील, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वार महाजन, सोपान पाटील यांचा समावेश आहे. सर्व इच्छुकांची नावे प्रदेश निवडणुक अधिकार्यांजकडे दिली जातील. महानगराध्यक्षपदासाठी शनिवारपर्यंत एकच नाव इच्छुक होते. रविवारी, मात्र त्यात इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यात निलेश पाटील यांच्यासह ऍड. सचिन पाटील, परेश कोल्हे, नामदेव चौधरी, शीतल साळी आणि उज्ज्वल पाटील यांचा समावेश आहे. या सहा जणांपैकी एकावर महानगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.