पेण मध्ये कंपाउंडर झाला बोगस डॉक्टर ; मागील 12 वर्षांपासून करतोय रुग्णांची फसवणूक

0

पेण : सध्या टीव्हीवर “देव माणूस” नावाने एक मालिका सुरू आहेत. या मालिकेत सुद्धा एक कंपाउंडर बोगस डॉक्टर बनून रुग्णांच्या जीवाशी खेळताना दाखविला आहे. प्रत्यक्षात तो देव माणूस नसून “दानव माणूस” असल्याचेही या मालिकेत दाखवण्यात आले आहे. या मालिकेप्रमाणेच पेण तालुक्यातील वाशी या गावात प्रत्यक्ष डेंटिस्ट ( दातांच्या डॉक्टरची डिग्री नसताना) केवळ दंत सहायकाचे प्रमाणपत्र असताना एका बोगस डॉक्टरने सुमारे 10 ते 12 वर्ष दातांच्या रुग्णांवर उपचार केले आहेत. सदर बोगस डॉक्टर रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचे काम करत आहे.

जयेश म्हात्रे याचे कडे दंत चिकित्सक म्हणून कोणतीही पदवी अथवा कायद्देशीर परवाना नसल्याचे उघड झाल्याने त्याच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी पेण मेडिकल असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र या बाबत वडखळ पोलिसांकडे 18 फेब्रुवारी 2021 ला तक्रार करून देखील अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नसल्याने पोलिसांच्या या “अर्थ” पूर्ण भूमिकेबद्दल सर्वत्र चर्चा होत आहे.

या बाबत संशय आल्याने पेण मेडिकल असोसिएशन ने या बाबत माहिती घेतली असता जयेश याचा चुलत भाऊ डॉ. रुपेश म्हात्रे हा पनवेल येथे वैद्यकीय व्यवसाय करत असून त्याच्या नावाखाली जयेश हा पेण वाशी येथे बेकायदेशीर पणे व्यवसाय चालवीत असल्याचे निदर्शनास आले.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा म्हात्रे यांनी केलेल्या चौकशीत देखील जयेश म्हात्रे हा डॉक्टर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या बोगस डॉक्टर कडे उपचार घेतलेल्या पीडित व्यक्तींनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास पुढे यावे असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी मनीषा म्हात्रे यांनी केले आहे . पेण वाशी येथील जयेश म्हात्रे या व्यक्ती कडे दातांचे डॉक्टर म्हणून ( डेंटिस्ट ) कोणतेही वैद्यकीय डिग्री नाही. तसेच मेडीकल रजिस्ट्रेशन नंबर नाही. त्यामुळे पेण तालुक्यातील दंत रुग्णांनी या व्यक्तीकडे कोणतेही उपचार करून घेऊ नयेे असेही डॉ. मनिषा म्हात्रे सांगितले.

बदलला दवाखान्याचा बोर्ड

पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा टाळण्याकरिता या बोगस डॉक्टराने श्री गजानन डेंटल क्लिनिक नावाचे बोर्ड तातडीने बदलले. सदरच्या जुन्या बोर्डावर या महाशयांनी स्वतःचा उल्लेख डॉक्टर म्हणून केला होता. कायदेशीर अडचणीत सापडू नये म्हणून या बोगस डॉक्टरने सदरचा बोर्ड बदलून त्याजागी श्री डेंटल केअर नावाने नवीन बोर्ड लावला आहे. या नवीन बोर्डावर कोणत्याही डॉक्टरचे नाव नाही. तसेच मेडीकलचे रजिस्ट्रेशनचा नंबरही नाही. बोगस डॉक्टर जयेश म्हात्रे याच्या बोर्ड बदलण्याच्या कृतीमुळे पुन्हा बोगस डॉक्टर नव्या नावाने फसवणूक करण्याकरीता तय्यार झाला की काय ?असा सवाल पेण तालुक्यातील नागरिक करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.