मुंबई : संथ गतीने होत असलेली इंधन दरवाढ ग्राहकांचे कंबरडे मोडणार आहे. आज बुधवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली. आज पेट्रोल २५ पैसे आणि डिझेल २५ पैशांनी महागले आहे. या दरवाढीने मुंबईत मात्र पेट्रोलने ९१ रुपयांची पातळी ओलांडली आहे.
मुंबईत पेट्रोल ऐतिहासिक पातळीच्या दिशेनं पुढे पुढे सरकरत आहे. आजच्या दरवाढीने पेट्रोल ९१ रुपयांवर गेले आहे. यापूर्वी ४ ऑक्टोबर २०१८ रोजी पेट्रोलने ९१.३४ रुपयांचा सार्वकालीन उच्चांकी स्तर गाठला होता. आजच्या दरवाढीनंतर पेट्रोल उच्चांकी पातळीच्या केवळ २७ पैसे दूर आहे. तर एक लीटर डिझेलचा भाव ८१.३४ रुपये झाला आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात कंपन्यांनी दोन दिवस दरवाढ केली होती. त्यानंतर सलग पाच दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते. दरम्यान, जागतिक बाजारात मात्र कच्च्या तेलातील तेजी कायम आहे. आज सिंगापूरमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.२९ डॉलरने वधारला आणि ५३.५० डॉलर झाला. ब्रेंट क्रूडचा भाव ०.९२ डॉलरने वधारला असून तो प्रती बॅरल ५६.५८ डॉलर झाला आहे. चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयात अवमूल्यन सुरु आहे. ज्यामुळे तेल आयातीचा खर्च वाढला आहे.
आज बुधवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९१.०७ रुपये आहे. एक लीटर डिझेलचा भाव ८१.३४ रुपये आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८४.४५ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७४.६३ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोलचा भाव ८७.१८ रुपये असून डिझेल ७९.९५ रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.९२ रुपये असून डिझेल ७८.२२ रुपये आहे. बंगळुरात आज एक लीटर पेट्रोलचा भाव ८७.३४ रुपये असून डिझेलचा भाव ७८.९८ रुपये आहे.