पूजा चव्हाणच्या मृत्यूचे ‘हे’ आहे कारण: पोस्ट मार्टममधून उघड

0

मुंबई : सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाण हिचा सविस्तर शवविच्छेदन अहवाल आला असून तिचा मृत्यू नेमका कशामुळं झाला हे त्यात स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

बंजारा समाजातील तरुणी पूजा चव्हाण हिनं मागील महिन्यात वानवडी येथे इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. त्यातील आवाज संजय राठोड यांचा असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर विरोधी पक्षानं हे प्रकरण उचलून धरत राज्य सरकारला घेरलं होतं. अखेर या प्रकरणात संजय राठोड यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

 

पूजा चव्हाण प्रकरणात इतका गदारोळ होऊनही पुण्यातील वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. कुठलीही तक्रार न आल्यानं गुन्हा दाखल केला नसल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं. आता पूजाचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यानुसार तिचा मृत्यू जबर दुखापतीमुळं झाला आहे. पूजाच्या मणक्याला व डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, असं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीनं ही माहिती दिली आहे.

 

पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर झालेल्या प्राथमिक तपासातूनही जबर दुखापत हेच कारण पुढं आलं होतं. आता शवविच्छेदनाच्या सविस्तर अहवालातून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. अर्थात, वानवडी पोलिसांनी याबद्दल आताच काहीही सांगण्यास नकार दिला आहे. लवकरच आम्ही माध्यमांना सविस्तर माहिती देऊ, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.