नवी दिल्ली : पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला झालेल्या भ्याड हल्ल्यात देशाचे चाळीस जवान शहीद झाले. या हल्ल्यात शाहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व्यापाऱ्यांनी आज देशव्यापी बंदची घोषणा केली आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्ये यामध्ये सहभागी होतील, असे अखिल भारतीय व्यापारी महासंघाने म्हटले आहे. या बंद दरम्यान देशभरातील किरकोळ व्यापाऱ्यांचा आज देशव्यापी बंद असेल, तसेच घाऊक बाजारपेठा बंद रहातील असे व्यापारी महासंघाने स्पष्ट केले आहे.
व्यापारी महासंघातर्फे विविध ठिकाणी श्रद्धांजली सभाही आयोजित करण्यात येणार असून, या सभेच्या आधी पाकिस्तान आणि चीन या दोन देशांमधील वस्तूंचं प्रतिकात्मक दहनही करण्यात येणार आहे. इतकंच नाही तर हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदत गोळा करून ती त्यांना पाठवण्यात येईल असेही महासंघाचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले.


