पुण्यात साडी सेंटरला भीषण आग : ५ कामगारांचा होरपळून मृत्यू

0

पुणे – पुण्यातील देवाची ऊरळी येथील रोडच्या लगत असलेल्या राजयोग होलसेल साडी डेपोच्या दुकानाला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत पाच कामगारांचा धुराने गुदमरून आणि होरपळून मृत्यू झाला. आगीत सेंटरमधील साड्या आणि इतर लाखोंचे साहित्य जळून खाक झाले आहे. राकेश रियाड (वय २२),धर्मराम वाडियासार (वय २५),राकेश मेघवाल (वय २५), सुरज शर्मा (वय २५) हे चारही  राहणार राजस्थान तर धीरज चांडक (वय २३),रा. लातूर असे मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत.

देवाची ऊरळी येथील राजु भाडळे यांच्या मालकीचे हे दुकान असून सुशील नंदकिशोर बजाज व भवरलाल हजारीलाल प्रजापती यांनी ते चालवण्यासाठी भाडेतत्त्वावर घेतले होते. दरम्यान, पहाटे सव्वा चारच्या दरम्यान या दुकानात आतमध्ये झोपलेल्या कामगारांचा मॅनेजरला आग लागल्याचा फोन आला. चोरी होऊ नये या उद्देशाने दुकानाला बाहेरून कुलूप लावण्यात येत असे. आतमध्ये पाच कामगार झोपले होते. शॉर्टसर्किटने आग लागल्याने आम्हाला गुदमरत आहे. बाहेर पडता येत नाही. असा फोन दुकानच्या मॅनेजरला आला. मॅनेजर तेथे जाईपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. बाहेरून कुलूप काढल्यानंतर कपडा असल्याने आगीने जोरात पेट घेतला. दुसऱ्या मजल्यावरील काचा फोडण्यात आल्या. मागून भिंत तोडण्यात आली आणि सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आली.  मात्र यातील कामगारांना वाचवण्यात यश आले नाही. त्यांनी खिडक्या वाकविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना बाहेर पडता आले नाही. सुमारे सात हजार स्केअर फुटच्या या दुकानात साडी  व रेडीमेड कपड्याचे दालन होते. चार राजस्थानचे तर एक लातूरचा कामगार राहण्याची सोय नसल्याने या दुकानातच आतमध्ये राहत होते. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि आठ ते दहा टॅंकरने ही आग विझविण्यात आली. सकाळी पावणेसातच्या सुमारास या दुकानामधून पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.