पुणे :- कर्णबधिर असोसिएशनने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाला पोलिसांनी थेट लाठीमार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. यात काही आंदोलक जखमी झाल्याने सर्वांनी अपंग कल्याण आयुक्तालयाच्या बाहेरील रस्त्यावर ठिय्या दिला. पोलिसांनी केलेल्या कारवाईवर विविध स्तरांतून टीका होत आहे.
राज्याच्या अपंग कल्याण आयुक्तालयाच्या आयुक्तपदावरून बालाजी मंजुळे यांची अवघ्या पावणेदोन महिन्यांत बदली केल्याचा राज्यस्तरीय कर्णबधिर असोसिएशनने निषेध केला. तसेच, कर्णबधिरांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी असोसिएशनच्यावतीने अपंग कल्याण आयुक्तालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी पायी मोर्चा काढण्याचे ठरविताच काहीजण पुढे आले. तेव्हा अपंग कल्याण आयुक्तालयाबाहेर लावलेले बॅरिकेटस् पडले. त्यानंतर, उडालेल्या गोंधळानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार सुरू केला. लाठीमारात अनेकांना पाय, गुडघे, पाठ व डोक्याला मार बसला. कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. पोलिसांनी संघटनेचे अध्यक्ष मनोज पटवारींसह सुमारे चारशेहून अधिक जणांना ताब्यात घेतले.
कर्णबधिरांच्या आंदोलनात झालेल्या लाठीमाराचे राज्यभरात राजकीय पडसाद उमटले आहेत. आपल्या न्याय्य हक्कांसाठी धरणे आंदोलन करणाऱ्या कर्णबधिरांवर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या प्रकाराचा राजकीय वर्तुळातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सायंकाळी आंदोलकांची भेट घेतली. ‘हा हल्ला निंदनीय, लाजिरवाणी गोष्ट आहे. गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायला हवा,’ अशी मागणी सुळे केली.