पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
पुण्यातील औंध भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक छोटं मंदिर उभारण्यात आलं आहे. भाजपाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी हे मंदिर उभारलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र दिसून येत होते अनेकजण येथे येऊन मोदींच्या मूर्तीच्या पाया देखील पडत होते. तसेच या मंदिराजवळ पंतप्रधान मोदींसाठी लिहिलेल्या विशेष आरतीचा बॅनरही लावण्यात आले होते. दरम्यान, येथे बांधण्यात आलेल्या नमो मंदिरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मूर्ती रातोरात हटविण्यात आली असून हे मंदिर बंद करण्यात आले आहे.
औंध गावातील मधुकर मुसळे यांच्या संकल्पनेतून मयूर मुंडे व आणि कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव म्हणून मोदी मंदिर उभारलं. परिसरातील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते १५ ऑगस्टला मंदिराचे उद्घाटन करण्यात आलं. देशभरात याबाबत मोठी चर्चा झाली. . दरम्यान, आज सकाळी औंधमधील मंदिर झाकण्यात आलं.
त्यातील मोदींचा पुतळादेखील मुसळे यांच्या कार्यालयात नेण्यात आला आहे. थेट पंतप्रधान कार्यालयाने दखल घेऊन हे मंदिर बंद करण्यात यावे अशी सूचना दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.