पुणे । मुंबई पाठोपाठ पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मुंबईनंतर पुणे शहर कोरोनाचे केंद्रबिंदू बनलं आहे. आज पुणे शहरात १५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील ११ रुग्ण नायडू रुग्णालयात तर ४ जण ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत. आता पुणे शहरात रुग्णांची संख्या १९० झाली असून जिल्ह्यातील संख्या २२५ झाली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
दरम्यान,या सर्व तणावाच्या परिस्थितीत एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील कोरोनाची लागण झालेले एकाच कुटुंबातील ५ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पुणे शहरात भीतीचं वातावरण आहे. मात्र, ५ रुग्ण बरे झाल्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. काल एका दिवसात २२९ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळं राज्यातील करोनाबाधितांची संख्या १३६४ वर जाऊन पोहोचली होती. मात्र आज १६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या ही १३८० झाली आहे. एएनआयने या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे .राज्यात नोंद झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी एकट्या मुंबईतील अर्ध्याहून अधिक रुग्णांचा समावेश आहे. मुबंईत आतापर्यंत ८७६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील चिंताजनक स्थिती पाहून लॉकडाऊन अधिक कठोर करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून त्यासाठी करोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या भागात राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत.