सतत गांजपाट करीत असल्याने मृत्यूला कवटाळ्याचा भावाचा आरोप
पाचोरा :-तालुक्यातील पिंपळगाव (हरे.) येथे २४ वर्षाच्या विवाहीतेने पॅसाॅकिल नावाचे विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. विवाहितेस विवाह झाल्यापासुनच पती व सासु, सासरे मारहाण व शारिरीक मानसिक त्रास होत असल्याने तिने आत्महत्या केली, असा आरोप मयत महिलेच्या भावाने केला आहे. दरम्यान या घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरे.) पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शिंदाड येथील वृषाली गौरव निकम (शिंपी) हिचा विवाह पिंपळगाव (हरे.) ता. पाचोरा येथील गौरव दयाराम पवार यांचेशी सन – २०१२ मध्ये झाला होता. विवाह झाल्यानंतर काही दिवस संसार सुरळीत चालला. वृषाली व गौरव यांना आठ व पाच वर्षांचे दोन मुलेही झाली. त्यानंतर कौटुंबिक वाद सुरू झाल्याने वृषाली हिस तीन ते चार वेळा माहेरी पोहचविल्याने माहेरच्या मंडळींनी समझोता करून वृषालीस नांदण्यासाठी सासरी पाठविले होते. गेल्या सहा महिन्यांपुर्वी वाद पोलिस स्टेशन पर्यंत पोहचल्याने पिंपळगाव हरे. येथील पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी पती – पत्नीतील वाद मिटविला होता. मात्र दि. २५ रोजी वाद विकोपाला गेल्याने वृषाली पवार हिने पॅसाॅकिल नावाचे विषारी औषध सेवन करुन आपली जीवन यात्रा संपविली. तिच्या मृतदेहाजवळ पॅसाकिल नावाच्या औषधीचा १०० ग्रॅमचा डबा आढळुन आल्याने पोलिसांनी तो जप्त केला आहे. माझ्या बहिणीस विवाह झाल्यापासुनच पती, सासु व सासरे मारहाण करून त्रास देत होते. या कारणामुळेच तिने आत्महत्या केली अशी माहिती वृषालीचा भाऊ राहुल गजानन निकम याने आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितली. मयताचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हरीभाऊ पवार करीत आहेत.