पावसाळ्याच्या दिवसांत मोबाइल आणि इ-गॅजेट्स खराब होण्याचा धोका सर्वाधिक असतो. आपल्यासाठी आपण जशी रेनकोट, छत्री यांची खरेदी करतो तशीच पावसाळा आल्यावर आपल्या गॅजेट्ससाठीही ‘रेनकोट’ खरेदी करणे गरजेचे असते. त्यामुळे त्यांच्यासाठीही पावसाळा सुरू होण्याच्या वेळीच बाजारात विकले जाणारे प्लास्टिक पाउच खरेदी करावेत. सध्या पाच-दहा रुपयांना विकले जाणारे प्लास्टिक पाउच सहज उपलब्ध होतात; परंतु त्यांची विश्वासार्हता म्हणावी तेवढी नक्कीच नसते. चालू वापरासाठी म्हणून हे पाउच ठीक असले तरी जरा जास्तीचा खर्च करून ऑनलाइन शॉपिंगमधून चांगल्या प्रतीचे वॉटरप्रूफ मोबाइल पाउचेस आपण मागवू शकतो. आणि शक्य असल्यास ते मागवावे. बऱ्याचदा या प्लास्टिक कव्हरमध्येही मॉईश्चर जमा होऊ शकतं. त्यासाठी त्यामध्ये सिलिका जेलचे छोटे पॅकेट्स ठेवावेत. हे अगदी छोटे पांढऱ्या रंगाचे पॅकेट्स आजूबाजूच्या हवेत असणारी आद्रता शोषून घेतात. त्यामुळे आपले गॅजेट्स खराब होण्याचा धोका कमी होतो. मोबाइल प्रमाणापेक्षा अधिक काळ चार्ज करू नये. चार्जिग झाल्यावर मोबाइल काढून ठेवावा. चार्जिग करण्यासाठी स्वस्तातील व कमी क्वालिटीचे चार्जर वापरणे टाळावे. अचानक वीज पडल्यास अगर व्होल्टेज कमी अधिक झाल्यास आपला फोन अगर इ-साधने खराब होऊ शकतात. शक्यतो आपल्या मोबाईलसाठीचा ओरिजनल चार्जर वापरावेत. शक्यतो जोरदार विजा चमकत असताना ई-वस्तू वापरणे टाळावे. काळजी घेऊनही आपला मोबाइल ओला झालाच तर काळजी नसावी. लगेच मोबाइल खराब होत नाही, कारण प्रत्येक मोबाइल हा अनेक खडतर चाचण्यांतून गेलेला असतो. परंतु पुढील काही बाबी करणे अतिशय आवश्यक आहे. सर्वप्रथम मोबाइल पाण्यातून काढावा व तो चालू असल्यास लगेचच स्वीच ऑफ(बंद) करावा. कारण मोबाइल अगर कोणतेही इ- गॅजेट ओले झाल्यानंतर त्याच्या सर्किटमध्ये पाणी जाते आणि जर त्यातून विद्युतप्रवाह चालूच राहिला तर हानिकारक ठरू शकते. त्यामुळे लगेचच बंद करून त्यातील बॅटरी काढून टाकावी. मग तो सुकवावा. ओला फोन कधीही चार्ज करू नये. पावसाळ्याच्या दिवसात फोन अगर कोणतेही गॅजेट चार्जिगला लावण्यापूर्वी त्याचा चार्जिग पोर्ट ओला नसल्याची खात्री करून घ्या. ओला झालेल्या गॅजेटला आतून पुसण्यासाठी कधीच कापूस अगर कापडाचा वापर करू नका. त्यातील लहान धागे सर्किटमध्ये अडकल्यास ते काढणे कठीण होते. मॉन्सून काळात आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांची योग्य काळजी घेतलीत तर ते नक्कीच जास्त काळ आपल्याला सेवा देतील.