जळगाव, दि. 13-
धरणगाव तालुक्यातील पाळधी फाट्याजवळील साईबाबा मंदिरानजीकच्या महामार्गावर टायर फुटल्याने चारचाकी उलटून झालेल्या अपघातात रविवारी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या भगिनी स्नेहजा रुपवते यांचे तसेच कार धडकलेल्या दुचाकीवरील वासुदेव दशरथ माळी अशा दोघांचा मृत्यू झाला होता. दरम्यान दुचाकीवरील दुसरा गंभीर जखमी चेतन लक्ष्मण पाटील (वय 22, रा. असोदा) याचाही रविवारी रात्री 11.10 वाजता उपचार सुरु असताना खाजगी दवाखान्यात मृत्यू झाला. चेतन याच्या मृत्यूनंतर या भीषण अपघातातील मृतांची संख्या आता तीन झाली आहे. चेतनला जिल्हा सामान्य रुग्णालय त्यानंतर ओम क्रिटीकल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान स्नेहजा रुपवते यांचा कारचालक अशपाक खान या गंभीर जखमीची प्रकृती स्थिर आहे. त्यास गणपती हॉस्पिटल येथे, तर इतर जखमींना कोचर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. इतर जखमींवर गणपती हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. या अपघातातील जखमींची संख्या आता 6 आहे.