जळगाव | महापालिकेच्या आगामी अडीच वर्षांच्या कालखंडासाठी महापाैर व उपमहापाैर निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या १८ मार्च राेजी नूतन पदाधिकाऱ्यांची निवडणूक हाेणार आहे. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड हाेईल. ९ ते १६ मार्चदरम्यान नामनिर्देशनपत्र घेता येणार असून १७ मार्च राेजी ते दाखल करता येईल.
महापाैर भारती साेनवणे व उपमहापाैर सुनील खडके यांचा कार्यकाळ १७ मार्च राेजी संपणार असल्याने १८ मार्च राेजी निवड हाेणार आहे. विभागीय आयुक्तांनी यासंदर्भात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड हाेणार आहे.
महापाैर व उपमहापाैर पदासाठी ९ ते १६ मार्च या दरम्यान सुटीचे दिवस वगळता सकाळी ११ ते दुपारी १ वाजता नगरसचिवांकडे नामनिर्देशनपत्र घेता येणार आहेत. १७ राेजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल. अर्जांची छाननी १८ राेजी विशेष सभा सुरू झाल्यानंतर हाेईल. छाननीनंतर माघारीसाठी १५ मिनिटे वेळ दिला जाणार आहे. एकाच जागेसाठी जास्त अर्ज आल्यास मतदान घेतले जाईल. महापाैर निवडीनंतर उपमहापाैरांची निवड हाेणार आहे.