जळगाव : पालघरमध्ये दरोडेखोर असल्याच्या संशयावरून दोन साधू, एक ड्रायव्हर हत्या करण्यात आली आहे. या सामूहिक हत्या कांडावर आता देशभरातून तीव्र प्रतिक्रीया उमटायला सुरुवात झाली आहे. यावेळी साधूंना मारहाण करत असताना पोलिसांनी काही का केले नाही? असा सवाल केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आपली प्रतिक्रिया देत पोलिसांच्या भूमिकेबद्दल भाष्य केलं आहे.
पालघर येथे जमावाकडून तीन जणांची हत्या होणे हा अत्यंत दुर्दैवी प्रकार असून हेतू पुरस्सर हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप हा दुर्दैवी आहे. या प्रकरणावर राष्ट्रीय रंगाने आरोप न करता राजकारण कुणीही करू नये, अशी प्रतिक्रिया निकम यांनी दिली.
पालघर येथे जमावाकडून तीन लोकांची हत्या होणे हा अत्यंत दुर्देवी प्रकार आहे. अर्थात त्यातील दोघं साधू होते आणि त्यांच्या वाहनचालक होता. हे सगळं घडलं तेव्हा हा जमाव चिडलेला होता. जमावाच्या हातात काठ्या होत्या आणि हा जमाव त्या तिघी निर्दोष व्यक्तींना पोलिसांसमक्ष मारत होता. त्यामुळे यातून राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यात येते आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना होती, पोलीस फक्त तीनच होते जमाव अफाट होता, असंही निकम यांनी सांगितलं. काही वर्षांपूर्वी धुळे जिल्ह्यात जमावाकडून पाच लोकांची देखील हत्या करण्यात आलेली होती. फरक एवढाच आहे की धुळे येथील घटनेमध्ये पोलीस हजर नव्हते. मात्र इथे तीन पोलीस हजर होते. परंतु, हेतुपुरस्कर हे करण्यात आले हा आरोप अत्यंत दुर्देवी आरोप आहे, असं मला सकृत दर्शनी वाटतं,’ असं मतही निकम यांनी व्यक्त केलं.
परंतु, ‘पोलिसांनी त्या तिघांना वाचण्याचा प्रयत्न काही केले नाही, असं व्हिडिओ फुटेजवरून दिसते आहे. अर्थात सरकारने या तिघा पोलिसांना निलंबित केले आहे. सीआयडीकडे चौकशी देण्यात आली असून त्यांची खातेनिहाय चौकशी होईल’, अशी माहितीही त्यांनी दिली.