पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हमालीच करावी का? आ. स्मिता वाघ यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांचा उद्रेक
जळगाव :- आ. स्मिता वाघ यांच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यात सर्वत्र उत्तम प्रतिसाद असताना ऐनवेळी उमेदवारी मागे घ्यावी लागल्याने आ. स्मिता वाघ यांच्या निवासस्थानासमोर जिल्हाभरातील आलेल्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. जिल्हाभरातील कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त करत चार दिवसापुर्वी आलेल्या व्यक्तीला तिकीट दिले जाते. मग पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हमालीच करावी का? आ. स्मिता वाघ यांना जिल्हाभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आमच्याकडे टक्केवारी आहे. आम्ही आमच्या पद्धतीने आता कामाला लागू असा संतप्त इशारा देण्यात आला. ए. टी. नानांना त्यांच्या शालकाच्या गावातही मते मिळाली नसल्याच्या संतप्त भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. आ. स्मिता वाघ यांच्या निवास्थानासमोरील वातावरण अतिशय धीरगंभीर होते.
उमेदवारी नाकारण्याची पद्धत चुकीची- आ. स्मिता वाघ
आपणास उमेदवारी नाकारल्याचे वाईट वाटत नसून ती ज्या पद्धतीने नाकारण्यात आली त्याचे वाईट वाटत असल्याचे आ. स्मिता वाघ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मी पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ती आहे. गेल्या चाळीस वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून आपण कार्य करीत आहोत. पक्षाने आपल्याला लोकसभेची उमेदवारी दिली, अर्ज दाखल करून आपण प्रचारास सुरुवातही केली होती. तब्बल शंभर गावे आपण प्रचार केला, प्रत्येक घरी भेट दिली, आणि आता आपल्याला पक्षाने उमेदवारी रद्द केल्याचे कळविले आहे. आपल्याला उमेदवारी नाकारल्याचे वाईट वाटत नाही परंतु ज्या पध्दतीने ते नाकारण्यात आले आहे. त्याचे वाईट वाटते. आम्ही निष्ठावान आहोत, त्यामुळेच पक्षाने आमची उमेदवारी कापली आहे, अशी आमची खात्री झाली आहे, असेही यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त केली. भारतीय जनता पक्षात आम्ही चाळीस वर्षापासून काम करीत आहोत, निष्ठेने काम करीत आहोत, परंतु एबी फॉर्मसह अर्ज भरलेला असतांना आमचे तिकीट कापून चार वर्षापूर्वी पक्षात आलेल्यांना उमेदवारी देण्यात आली. आमचा हा कोल्ड मर्डर आहे. तरीही आम्ही पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा निष्ठेने प्रचार करणार आहोत. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती पोपट तात्या भोळे, पी.सी.आबा पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उज्वला पाटील यांचे पती मच्छिंद्र पाटील, माजी पं.स.सभापती श्याम अहिरे, तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील, वी.आर.पाटील, जिजाबराव पाटील, मीनाताई पाटील, माजी जिप सदस्य सुभाष पाटील तसेच त्यांच्या अमळनेर मतदार संघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या पक्षासोबत राहण्याच्या सूचना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री स्मिता वाघ यांच्याशी संपर्क साधून उमेदवारीमध्ये काही बदल असेल तर तुम्ही पक्षाच्या निर्णयासोबत राहा, असे सुचविले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.