जळगाव :- शहरातील पिण्याच्या पाण्याचे तसेच इतर वापराच्या पाण्याचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा व्हावा या मागणीसाठी आज शहरातील कांचनगरातल्या महिलांनी महापालिकेवर हंडा मोर्चा काढला. गेल्या वर्षभरापासून या परिसरात नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाणी मिळत नसल्याची ओरड सुरू होती. प्रशासनाकडे कर भरून, वारंवार तक्रारी नोंदविल्यानंतरही समस्या सुटत नसल्याने आज ८ रोजी महिलांनी महापालिकेवर हंडा मोर्चा नेत आपल्या समस्या मांडल्या. यावेळी आयुक्तांनी आश्वासन दिल्यानंतर हंडा मोर्चा मागे घेण्यात आला. यावेळी नगरसेवक किशोर बाविस्कर उपस्थित होते.
शहरातील सध्या पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहे. यातच कांचननगरातील प्रशांत चौकाजवळ असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिर परिसरामधील नागरिकांनी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या भागातील पाईपलाईन नादुरूस्त झाल्यामुळे गत एक महिन्यापासून ही अडचण येत आहे. 2 एप्रिल रोजी देखील याबाबत मनपा आयुक्तांना निवदेन दिले तरीही कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याने महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी या परिसरातील स्त्री-पुरूषांनी आज थेट महापालिकेवर हंडा मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. दरम्यान, आयुक्त उदय टेकाळे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांची समस्या निराकरण करण्याचे आश्वासन दिल्याने मोर्चेकरी परतले.