पाणी समस्या जळगावकरांच्या पाचवीलाच

0

वाघूर मुख्य जलवाहिनीला पुन्हा गळती;पाणीपुरवठा एक दिवस उशिरा

जळगाव-

जलवाहिनी गळतीचे शुक्लकाष्ट मिटत नसून ऐन उन्हाळ्यात तीन दिवसाआड करण्यात आलेला पाणी पुरवठा एक दिवस उशिराने होणार आहे. त्यामुळे जळगावकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पाणी समस्या ही जणू जळगावकरांच्या पाचवीलाच पुजली गेली असल्याचे चित्र आहे.

वाघुर पाणी पुरवठा योजनेंतर्गत शहरास पाणी पुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहिनीवरील अजिंठा रोडवरील मानराज मोटर्स व राहूल ट्रॅक्टरसमोर नाल्यालगत 1500 मीमी व्यासाचीएम. एस. पाईप लाईनवर गळती होत आहेे. तिच्या दुरुस्तीचे काम दि. 21 रोजी सकाळी 9 वा. हाती घेण्यात आले आहे. त्या कामास 20 तास त्यापेक्षा जास्त वेळ लागणार असल्याने शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला असून दि. 21 चा पाणीपुरवठा दि. 22 रोजी 22 चा दि. 23 रोजी दि. 23 चा 24 रोजी तर दि. 24 चा दि. 25 रोजी करण्यात येणार आहे.

नेहमीच्या त्रासाला कंटाळले नागरिक

आधीच शहरात पाणी टंचाई आहे. पाणी साठा ऑगस्टपर्यंत पुरावा यासाठी प्रशासनाने तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. तीन दिवसाआड पाणी येणार असल्याने पाणी वाचविताना मेटाकुटीस आलेल्या नागरिकांना पुन्हा एक दिवस पाण्याची वाट पहावी लागणार असल्याने नागरिक शहरातील पाणीप्रश्नाला पुरते कंटाळले आहेत.

पाईपलाईनला गळती लागतेच कशी?

शहराच्या विस्तारामुळे गिरणा प्रकल्पातून होणारा पाणी पुरवठा अपुरा होत होता. त्यासाठी वाघूर प्रकल्प राबविण्यात आला त्यामुळे त्याकाळी पाणी प्रश्न मिटला होता. मात्र वाघूरवरील जलवाहिनीला नेहमीच होत असलेल्या गळतीमुळे पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होत आहे. वर्षभरात अनेकदा पाईपलाईनला गळती लागत असल्याने पाईपलाईनला गळती लागतेच कशी? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. पाईपलाईन निकृष्ट दर्जाची आहे काय? की पाणी सोडण्यावेळी पाण्याच्या अतिदाबाने पाईपलाईनला गळती लागते ते तज्ज्ञांकडून तपासायला हवे. पाणी सोडताना पाईपलाईनला गळती लागणार नाही या पद्धतीने पाणी सोडले जावे, असे सुज्ञ नागरिकांचे मत आहे.

गळत्यांमुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी

एकीकडे पाणीटंचाई असल्याने पाणी जपून वापरण्याचा सल्ला प्रशासनाकडून दिला जातो. मात्र गळतीमुळे शहरात हजारो लिटर पाणी वाया जाते. त्यासाठी गळत्या दुरुस्ती अत्यावश्यक आहे. मात्र पाईपलाईन, व्हॉलव्हला गळती लागूच नये यासाठी प्रशासनाकडून काळजी घेणे आवश्यक आहे.

लग्नसराई त्यात पाणीटंचाई

शहरात सध्या लग्नसराईमुळे लग्नांची धामधूम सुरु आहे. मात्र पाण्याअभावी वर्‍हाडी मंडळींची गैरसोय होवू नये म्हणून पाण्याची वेगळी तजवीज करावी लागत आहे. लग्नसराईत पाण्याच्या जारचा धंदा तेजीत आला आहे. जेवणावळीत पिण्याच्या पाण्यासाठी जारलाच पसंती दिली जात असल्याने पाण्याच्या जारचा धंदा तेजीत आला आहे. तर पिण्याचे पाणी संपल्याने दोन हंडे पिण्याचे पाणी देता का? असा प्रश्न नागरिक एकमेकांना विचारुन पाण्याची तहान भागवत आहेत.

पाणी डायवेशनदरम्यान पाईपलाईन फुटली- प्रशांत नाईक

मारुती शोरूमजवळ पुलाचे काम सुरु आहे. पाणी डायवेशन करताना वाघूरची पाईपलाईन सोमवारी रात्री 1.30 वाजेच्या फुटली असल्याचा आरोप नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केला. मध्यरात्री अशी अचानक पाईपलाईन कशी फुटू शकते. काहीतरी कामाशिवाय हे शक्य नसल्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.