पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा – भडगाव तालुक्यात पाणी व चारा टंचाई समस्या गंभीर झाली आहे सोबतच शेतकऱ्यांचे दुष्काळी व अन्य अनुदान महसुल विभागाकडुन जिल्हा व राष्ट्रीयकृत बँकेत वर्ग करण्यात आले आहे. परंतु बँकाची शेतकऱ्यांबाबत असलेली उदासीनता व भोंगाळ कारभारामुळे ही अनुदाने शेतकऱ्यांना मिळालेली नाही. पाणी, चारा टंचाई व शेतकरी अनुदान संदर्भांत मतदार संघातुन मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आहेत. तक्रारीचे निवारण करण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनीप्रांताधिकारी, पाचोरा भडगाव तहसिलदार, कृषी अधिकारी पंचायत समिती गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्यांची तातडीची बैठक घेवुन आवश्यक गावांना मागणी नुसार टँकर पुरविणे, चारा छावण्या, सुरू करणार्यां संस्था व्यक्तीना चारा छावण्या सुरू करण्याबाबत पावले उचलणे तसेच शेतकर्यांचे विविध अनुदान त्यांना लवकर मिळावे म्हणुन जिल्हा बँकेने तांत्रिक अडचणी दुर कराव्या अशा सुचना व आदेश आमदारांनी घेतलेल्या आढावा बैठकीत अधिकार्यांना दिले.
पाचोरा व भडगाव तालुक्यात दुष्काळ, भिषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्याची संमस्या गंभीर झाली आहे. तसेच चारा छावण्याच्या जटील अटी शर्तीमुळे कोणत्याही संस्था किंवा व्यक्ती छावण्या सुरू करण्यासाठी पुढे येत नसल्याने गुरा ढोरांना पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध होत नसल्याने मुके जनावरे चारा पाण्या अभावी रोडावत आहे. त्यामुळे पक्षुपालकांना आपली जनावरे गोशाळेत पाठवावी लागत आहे किंवा नाईलाजास्तव कवडीमोल भावात विकावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई, चारा टंचाई ही समस्या गंभीर असताना पावसाळा तोडावर आला आहे. शेती मशागतीची कामे करताना शेतकर्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. सद्यास्थितीतील दुष्काळी व मागील काळातील बोंड अळी नुकसान भरपाई व अन्य अनुदाने बँकामध्ये असतानाही शेतकर्यांना प्राप्त झाली नाही. अशा विविध प्रकारचा संमस्याच्या तक्रारी आमदारांकडे वाढल्या होत्या.