भोकरदन (जालना) :- तालुक्यातील दिवसेंदिवस तीव्र होणाऱ्या पाणी टंचाईने पहिला बळी गेला आहे. गोकुळ गावात एका १७ वर्षीय तरुणीचा पाय घसरून विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. विहिरीवर कपडे धुण्यासाठी पाणी शेंदतांवेळी हि घटना घडली. दिपाली विष्णू शिंदे (१७) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. गावातील पाणी टंचाईनेच या तरुणीचा बळी घेतल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
सविस्तर असे की, गावामधील महिलांबरोबर दिपाली हि सकाळी कपडे धुण्यासाठी गावाजवळील केळणा नाही पात्रा शेजारी असलेल्या एका विहिरीवरी गेली होती. दरम्यान कपडे धुण्यासाठी विहिरीतून पाणी काढत असतांनाच दीपालीचा पाय घसरला व ती सरळ विहिरीत पडली. या घटनेत तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिला गावकऱ्यांनी लागलीच भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
तालुक्यात अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. याच पाणी टंचाईमुळे आज भोकरदन तालुक्यात पहिला बळी घेतला आहे.