जळगाव । जिल्हयात दिवसेंदिवस पाणीटंचाई अधिक तीव्र होत असून आजमितीस 184 गावांना 168 टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती टंचाई निवारण विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. जिल्हयातील तीन मोठया प्रकल्पापैकी गिरणा प्रकल्पात सरासरी 18, हतनूर 3.50 तर वाघूर 18.50 टक्के जलसाठा सद्य:स्थितीत आहे. तर लघु मध्यम प्रकल्पात देखील गंभीर परिस्थिती आहे.
दि.०९ रोजी गिरणा प्रकल्पातून सकाळी 6 वाजता सुमारे 2000 क्युसेक पाण्याचे चौथे आवर्तन सोडण्यात आले असून त्याचे योग्य नियोजन करून पावसाळा सुरू होईपयर्ंत सर्वांना पाणी पुरेल, असे व्यवस्थापन करण्यात यावे. तसेच पाणीटंचाई निवारणार्थ काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकार्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. सद्य:स्थितीत सर्वात जास्त अमळनेर तालुक्यात 47 गावांना 30 टँकर, चाळीसगाव 35 गावांसाठी 39, पारोळा 34 गावे 24, जामनेर 32 गावांत 34 टँकर, पाचोरा तालुक्यात 18 तर भुसावळ 7 टँकर असे एकूण 184 गावांसाठी 168 टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय 272 गावांसाठी 278 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.