कणकवली : खासदार नारायण राणे यांचे पूत्र नितेश यांच्या प्रचारासाठी आज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येथे जाहीर सभा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. पाच वर्षाचा शेंबडा मुलगाही महायुतीचं सरकार येणार सांगतो असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे.
नितेश राणे यांनी यावेळी अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. “हा प्रवेश मुंबईत व्हावा अशी अनेकांची इच्छा होती. पण सिंधुदुर्गातील लोकांचं कणकवलीत प्रवेश व्हावा असं म्हणणं होतं त्यामुळेच येथे प्रवेशाचा कार्यक्रम करण्यात आला,” असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त करत एकूण मतदानाच्या ६० ते ७० टक्के मतं मिळतील असा दावा केला. देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना यावेळी संयम बाळगण्याचा सल्ला दिला. “नितेश राणे आक्रमक आहेत, कारण ते नारायण राणेंच्या नेतृत्त्वात घडले आहेत. पण नितेश राणे यांना आता आमच्या शाळेत घेतलं आहे. त्यांना आमच्या शाळेत संयम शिकवणार आहोत. नारायण राणे जिथे आक्रमक व्हायचं तिथं होतात, संयम बाळगायचा तिथे बाळगतात,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.