पाचोऱ्यात कोसळलेल्या इमारतीची चौकशी करा

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा या तालुक्याच्या ठिकाणी पाच वर्षापूर्वी बांधलेली तीन मजली इमारत पत्याच्या बंगल्यासारखी कोसळली. चारच दिवसापूर्वी त्या इमारतीत रहिवास असलेल्या भाडेकरू कुटुंबाला पाचोरा नगरपरिषदेच्यावतीने तेथून हलविण्यात आले होते. 6 महिन्यांपूर्वीच दुसऱ्या एका भाडेकरूने स्वतःहून रिकामे करून दुसरीकडे रहायला गेले होते. काल सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास ही इमारत कोसळली. तेव्हा धो धो पाऊस पडत होता. इमारत ज्या भागात पडली तिथे मोकळी रिकामी जागा असल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. हे सुदैवच म्हणावे लागेल.

पाच वर्षापूर्वी तेव्हा ही इमारत बांधली गेली तेव्हा बांधकामातील काही तांत्रिक चुका राहिल्या असल्यामुळे ही इमारत कोसळल्यास कारणीभूत ठरली. अन्यथा पाच वर्षापूर्वी तीन मजली इमारतीचे बांधकाम झाले असतांना इतक्या कमी कालावधीत इमारत पडलीच कशी? हा महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो.

इमारत ही पाचोरा शहरातील मध्यवस्तीत असल्यामुळे इमारतीचे बांधकाम करण्याची परवानगी घेण्यापासून ते बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नगरपालिकेच्या संबंधित विभागाच्यावतीने परवानग्या दिल्या गेल्या असतील. ही इमारत पूर्ण झाल्यानंतर बांधकाम तंत्रज्ञानानुसार तिचे बांधकाम झाल्यासंदर्भात पहाणी करूनच ही परवानगी दिली गेली असेल. जर स्पेसिफिकेशन प्रमाणे बांधकाम झाले होते तर पाच वर्षातच इमारत कोसळण्याचे कारण काय? सहा महिन्यापूर्वीच या इमारतीला तडे गेलेले स्पष्ट दिसत असल्यामुळे ही इमारत धोकायदायक आहे हे नगरपालिकेच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्या इमारतीत भाड्याने राहणाऱ्या कुटूंबियांना सूचना दिल्या गेल्या होत्या. म्हणून सुदैवाने ही इमारत माणसांविना रिकामी होती. अन्यथा तेथे रहिवास असता तर काय हाहाकार माजला असता या कल्पनेने अंगावर शहारे येतात.

कारण रात्री पाऊस कोसळत असतांना ही इमारतपण कोसळली. रात्रीची वेळ आणि पावसामुळे रस्त्यावर लोकांची रहद्दारीसुध्दा नव्हती. जर ही इमारत दिवसा कोसळली असती तर निश्चितच प्राणहानी झाली असती. परंतु सदैवाने प्राणहानी झाली नाही. सदर कोसळलेली इमारत ज्यांच्या मालकीची आहे त्या साजीदाबी शेख खलील या मुंबई येथे वास्तव्यास असतात. म्हणजे ही इमारत रहिवासासाठी बांधण्यात आली असली तरी मालकाने त्याच उपयोग व्यवसाय म्हणून केलेला होता. त्या इमारतीत भाडेकरू ठेवून त्या भाड्यामधून उत्पन्न मिळविणे हाच त्यांचा हेतू होता हे मात्र निश्चित. त्यामुळे बांधकाम दर्जेदार होते किंवा नाही याचेकडे घरमालकाचे दुर्लक्ष झाले असावे. परंतु शिवाय ही बाब अत्यंत गंभीर आहे. मालकाला याचा जाब विचारणे आवश्यक आहे. कोसळलेल्या इमारतीचे बांधकाम मटेरियल तसेच पडलेले आहे. मालकाच्या उपस्थितीत ते मटेरियल उचलले जाईल.

पाच वर्षापूर्वी शहराच्या मध्य वस्तीत बांधलेली तीन मजली इमारत पत्याच्या बंगल्यासारखी कोसळते? याची प्रथम तज्ज्ञांमार्फेत चौकशी झाली पाहिजे. बांधकाम पूर्व बांधकामाची परवानगी आणि बांधकामानंतर कप्लेशन सर्टिफिकेट हे पूर्ण तपासांनी दिले गेले होते काय? त्याची चौकशी झाली पाहिजे. त्याच बरोबर या कोसळलेल्या तीन मजली इमारतीचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराची तसेच आर्किटेक्ची चौकशी होणे गरजेचे आहे. कारण शहराच्या मध्यभागी तीन मजली इमारतीचे बांधकाम करतांना त्यासाठी वापरण्यात आलेले मटेरियल दर्जेदार होते किंवा नाही. याची सुध्दा तज्ज्ञामार्फेत चौकशी झाली पाहिजे. या सर्व बाबींची चौकशीमध्ये जे जे दोषी असतील. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून चौकशी केली पाहिजे. तरच अशाप्रकारे गैरकृत्य करणाऱ्यांवर जबर बसेल अन्यथा बसणार नाही. त्याच बरोबर यानिमित्ताने पाचोरा शहरात असलेल्या धोकादायक इमारतीचा सर्व्हे करून त्यांची नोंद करावी. अशा धोकादायक इमारतीच्या संदर्भात तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून पहाणी व चौकशी करून त्या इमारतीसंदर्भातही निर्णय घेणे आवश्यक आहे. धोकादायक इमारत असेल तर त्या इमारतीत राहणाऱ्यांना तेथून दुसरीकडे हलविणे आवश्यक आहे. पाचोरा नगरपालिकेचे प्रशासन आणि लोकप्रतिनिधीनी यांची जातीने दखल घेणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here