पाचोरा ️ प्रतिनिधी
कोरोना व्हायरसमुळे नागरिकांच्या समस्यांचा पाढा काही कमी होतांना दिसत नाही आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दि. ७ रोजी सकाळ पासुनच शहरा लगतच्या गावातील शेतकऱ्यांनी ज्वारी, बाजरी, मका, यासारखे कडधान्य विक्रीसाठी आणले होते. बाजार समितीचे मेन गेट बंद करण्यात आले आहे. व मागील गेटने वाहनांना प्रवेश देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आणलेल्या मालाचे वजन करुन मुख्य दरवाजाने त्यांना बाहेर जाण्याचा मार्ग खुला करण्यात आला होता. यामुळे बाजार समितीच्या मागील गेट पासुन पुनगाव रोड, शासकीय विश्रामगृह, राजे संभाजी चौक ते महाराणा प्रताप चौकापर्यंत सुमारे दोन ते तीन कि.मी. पर्यंत ट्रक्टर, ४०७, मालवाहु रिक्षा या सारख्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे शेतकऱ्यांना कडक उन्हात नंबर लावुन आपला नंबर लागण्याच्या प्रतिक्षेत होते.
*सामाजिक कार्यकर्त्यांनी भागवली शेतकऱ्यांची भुक*
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकविलेला माल विक्रीसाठी आणला होता. परंतु बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ खाजगी रुग्णालय, बॅंका, मेडिकल स्टोअर्स असल्याने याठिकाणी ट्राफिक जाम होवुन नये म्हणुन मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवत मागील गेट प्रवेश सुरु केला होता. या कारणामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी सहा वाजेपासून रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून येथील सामाजिक कार्यकर्ते महाविर गौड, सागर ओझा, आनंद प्रजापत, हेमंत ओझा यांनी शेतकऱ्यांना खिचडी व चहा मोफत देवुन त्यांची भुक भागवली.
*बॅंका व खाजगी सेंटरवर लांब रांगा*
रविवारची सुट्टी व सोमवारी महाविर जयंती यामुळे सलग दोन दिवस बॅंका बंद असल्याने दि. ७ रोजी सकाळी ८ वाजेपासुनच ग्राहकांनी बॅंकांसमोर रांगा लावल्या होत्या. याच सोबत बॅंकांचे खाजगी सेंटर वर जनधनचे नविन खाते उघडण्यासाठी महिलांनी रणरणत्या उन्हात लांब रांगा लावल्या होत्या. एकुणच कोरोना व्हायरसमुळे जनजीवन कसे विस्कळीत झाले आहे हे यावरून दिसुन येत आहे.